भारतीय स्वातंत्र्यलढ्यात तुमचे योगदान काय, असा सवाल उद्धव ठाकरे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वारंवार विचारत आहेत. पण, जे जन्मले १९६० मध्ये, त्यांच्याकडून हा सवाल विचारला जाणे, हास्यास्पद आहे, असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्ही कुठे होतो, हे समजून घ्यायचे असेल, तर तु्म्हाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समजून घ्यावे लागतील, असेही शेलार म्हणाले.
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार मधू चव्हाण, माजी महापौर अरुण देव, सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी, वीरपत्नी प्रतिभा भट उपस्थित होते. शेलार पुढे म्हणाले, सत्तेसाठी तुम्ही विचारांशी तडजोड केली. पण विचारांसाठी सत्ता कशी सोडतात, हे अनुभवायचे असेल, तर उद्धव ठाकरे तुम्हाला श्यामाप्रसाद मुखर्जी अभ्यासावे लागतील. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्ही कुठे होतो, हे त्यांना समजावून सांगण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुस्तके नाना पटोले, सिल्वर ओक, मातोश्रीवर पाठवा, असे आवाहन त्यांनी आयोजकांना केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच काश्मीरमधील ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेले नाईक सुधाकर भट यांच्या वीरपत्नी प्रतिभा भट यांचाही सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.
उद्धव ठाकरे, तू मोदींची लस घेतली म्हणून जिवंत राहिलास – प्रसाद लाड
- मोदींनी लस निर्माण केली का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी वरळीतील सभेतून विचारला. अरे उद्धव ठाकरे, तू तिच लस घेतली म्हणून जिवंत राहिलास, अशी खरमरीत टीका प्रसाद लाड यांनी यावेळी केली.
- मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. आता खरा सर्जिकल स्ट्राईक मुंबई महापालिकेवर होत आहे. आम्ही अलीकडेच शिलाई मशीनचे वाटप केले, त्यातील काही ठाकरे गटाच्या नेत्यांना पाठवायला हव्यात, असेही ते म्हणाले.
- २४ विरोधी पक्ष एकत्र येऊन मोदींना हरवण्याची रणनीती आखत आहेत. महाराष्ट्रातून तीन माकडंही तिकडे गेली आहेत. पण नुकताच एक सर्व्हे आला आहे, त्यात नरेंद्र मोदी यांना ७६ टक्के लोकांनी जागतिक नेतृत्व म्हणून पसंती दर्शवली आहे. त्यामुळे यांचे मनसुबे कदापी सफल होणार नाहीत, असेही लाड म्हणाले.
- दरम्यान, हे महागठबंधन नव्हे, तर महाठगबंधन आहे. कारण, भारत आज प्रगतीपथावर जात असताना, त्यात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे. त्यांचे प्रयत्न सफल होऊल देणार नाही, अशी टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.