राज्यात विधानसभा (Assembly Election 2024) निवडणुकीच्या प्रचारांचा अंतिम टप्पा सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी २८८ मतदार संघासाठी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे, तत्पूर्वी अंतिम प्रचारसभांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, विधानसभा प्रचारसभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Telangana Revanth Reddy) यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात (Bhokar Assembly Constituency) अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. या टीकांवर अशोक चव्हाण यांनी पलटवार केला. (Ashok Chavan)
प्रचारसभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की, काँग्रेसनं (Congress) त्यांना दोन वेळा मुख्यमंत्री बनवलं, खासदार बनवलं, त्यांच्या वडिलांना पण मुख्यमंत्री बनवलं , काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची सर्व पदे दिली. अशोक चव्हाण यांनी त्या बदल्यात काय केलं काँग्रेस पक्षाला, गांधी परिवाराला आणि नांदेडच्या लोकांना धोका देऊन, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ते मोदींच्या समोर जाऊन गुलामगिरी करत आहेत, अशी टीका रेवंत रेड्डी यांनी केली होती.
या आरोपांवर भाजपा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी रेवंत रेड्डी यांना चांगलेच धारेवर धरले आहे. चव्हाण म्हणाले की, पैशाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत नाही. काँगेसने काय थैमान घातलंय ते पाहा जरा, असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे घेण्याची मला गरज नाही. आरएसएस (RSS), तेलुगू देसमला दगा देऊन ते काँगेस मध्ये आले, असं प्रत्युत्तर दिलं आहे.