वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगावरून देशभरात चर्चा सुरू आहे. याबाबत वाराणसी न्यायालयाने आदेश दिला आहे. येथे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास वाराणसी न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी न्यायालयाने काही अटीशर्थी लावल्या आहेत. यासंदर्भातील आदेश भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले आहेत.
ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू बाजूचे प्रतिनिधित्व करणारे विष्णू शंकर जैन म्हणाले की, ज्ञानवापी मशिदीत वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी द्यावी, यासंदर्भात याचिका करण्यात आली होती. या याचिकेतील मागणी मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालायने सील केलेले कारंजे सोडून ज्ञानवापी मशीद संकुलाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात ज्ञानवापी संकुलाच्या व्हिडिओग्राफिक सर्वेक्षणात मशिदीच्या आवारात ‘शिवलिंग’ असल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. मुस्लीम बाजूने ही रचना केवळ कारंजे असल्याचा दावा केला होता. त्यामुळे वाराणसी न्यायालयाने स्पष्ट केले की, ज्या वुझुखाना येथे ‘शिवलिंग’ सापडले आहे, ते ASI च्या “वैज्ञानिक सर्वेक्षण” च्या कक्षेबाहेर ठेवले जाईल.
(हेही वाचा Heavy Rain : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस; अंधेरी सबवेसह अनेक सखल भाग पाण्याखाली)
‘या’ अटी पाळाव्या लागणार
जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांच्या न्यायालयाने शुक्रवारी एएसआयला ४ ऑगस्टपर्यंत अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने पुढे सांगितले की, एएसआयचे वैज्ञानिक सर्वेक्षण सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत झाले पाहिजे. नमाज पठणावर कोणतेही निर्बंध नसून ज्ञानवापी मशिदीचे कोणतेही नुकसान होऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
“विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पुरतत्व तपासणी करणेच योग्य ठरेल”, असा युक्तीवाद जैन यांनी केला होता. “संपूर्ण संकुलाची आधुनिक पद्धतीने तपासणी केल्यानंतरच हे प्रकरण स्पष्ट होऊ शकेल”, असंही ते म्हणाले. “इमारतीच्या पश्चिमेकडील भिंत आणि घुमट यांच्या बांधकामाचे वय आणि स्वरूप तपासणे महत्त्वाचे आहे. यामुळे मशिदीखाली मंदिराचा भाग अस्तित्वात आहे की नाही हे स्पष्ट होईल. याशिवाय स्वस्तिकच्या खुणा, अनेक भिंतींवरील श्लोक आणि इतर अनेक वस्तुस्थिती देखील तपासली पाहिजे, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
Join Our WhatsApp Community