अस्लम शेख हे शहराचे पालकमंत्री की मालाडचे?

173

मालाडमधील क्रीडांगणाला टिपु सुलतान यांचे नाव देण्यावरून वादात अडकलेले आमदार व मंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात विभागातील नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. मालाड पश्चिम दिशेला रस्त्यांची व गटारांची कामे हाती घेण्यात आली असून या सर्व कामांच्या ठिकाणी आमदार व मंत्री अस्लम शेख आणि त्यांच्या मुलाचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासकामांवर आमदारांचा अधिकार कसा, असा सवाल नगरसेवकांकडून केला जात असून महापालिकेच्या प्रत्येक कामांवर अधिकार सांगत जाहिरातबाजी करणारे अस्लम शेख हे शहराचे पालकमंत्री आहेत की मालाडचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिका प्रभागांतील विकासकामांचे श्रेय अस्लम शेख घेतात

मालाडमधील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख असून या मालाडमध्ये अस्लम शेख यांच्या या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या ३, शिवसेना एक आणि भाजपच्या दोन नगरसेवकांचा समावेश आहे. परंतु या मालाड पश्चिममधील अनेक रस्त्यांची कामे महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. या रस्त्यांसह पर्जन्य जलवाहिन्यांचीही कामे केली जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागांसह भाजपच्या नगरसेविका योगिता कोळी, भंडारी तसेच जया सतनाम तिवाना यांच्या प्रभागांमध्ये अस्लम शेख यांनी आपले फलक लावून आपली जाहिरात बाजी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका स्टेफी केणी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या गीता भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. परंतु यांच्या प्रभागातील विकासकामांचे श्रेय अस्लम शेख हे घेत असल्याचे दिसून येत आहे.

Aslam

(हेही वाचा मुंबईतील कोणत्या प्रभागांमध्ये अनुसूचित जातीची किती लोकसंख्या? जाणून घ्या…)

अस्लम शेख यांच्या श्रेय लाटण्यावरून सेना-भाजपात नाराजी

मालाडमधील प्रत्येक विकासकाम हे केवळ आपल्याच प्रयत्नातून होत असून नगरसेवकांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारे जुमानले नाही. महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये नगरसेवकांचे श्रेय अधिक असताना अस्लम शेख हे या सर्व कामांचे श्रेय प्रत्येक कामांच्या ठिकाणी फलक लावून घेत असल्याने शिवसेनेसह भाजपचेही नगरसेवक त्रस्त झाले आहेत. उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे असून अस्लम शेख हे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातही आपली दादागिरी करत असताना उपनगराच्या पालकमंत्र्यांकडून याची दखल घेतली जात नसल्याबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. आदित्य ठाकरे हे अस्लम शेख यांचे मित्र असल्याने मैत्री जपण्यासाठी ते त्यांच्या प्रभागात विशेष लक्ष देत नसल्याचेही बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.