- सुजित महामुलकर
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार दिवसांपूर्वी संपले. महायुतीच्या या पहिल्यावहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी जी काही (सक्तीने) सहकार्याची भूमिका घेतली, त्याला तोड नाही. साडेतीन आठवडे सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाकडून एकदाही सभागृह बंद पाडण्याचा प्रकार घडला नाही, उलट तीन वेळा सत्ताधारी आमदारांनीच सभागृह डोक्यावर घेतले आणि काही मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्याची वेळ आली. यावरूनच आगामी साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विरोधी पक्ष कुठे दिसेल, याची झलक मिळते.
अबू आझमींचे निलंबन एकमताने
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (३ मार्च २०२५), समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करत औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, अशी मुक्ताफळे उधळली. दुसऱ्या दिवशी त्याचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. भाजपा-शिवसेनेच्या आमदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत आझमी यांच्या निलंबनाची जोरदार मागणी सभागृहात केली. त्यांच्या भाषणावेळी शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि अन्य आमदार शिंदे यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) आमदार अलिप्त राहत आसनावर बसून शिवसेना उबाठाची सुरू असलेली आरडाओरड शांतपणे पाहत होते. तिसऱ्या दिवशी या अधिवेशन कालावधीसाठी आझमी यांचे निलंबन करण्याचा ठराव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि ‘एकमता’ने म्हणजेच विरोधकांनी मौन धरण करत ठरावाला पाठिंबा देत सहकार्य केले. (Assembly Budget Session 2025)
(हेही वाचा – माजी आमदार Shahajibapu Patil यांचे कुणाल कामराला गाण्यातून प्रतिउत्तर; म्हणाले, मातोश्री के अंगण मे…)
वेळेची बचत
बीडचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे काही व्हिडिओ माध्यमात व्हायरल झाले आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लागला. त्याचाही फार गाजावाजा विरोधकांनी न करता, सहकार्य केले. ते संपत नाही तोवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी गोवंडी ‘आयटीआय’च्या नामांतर सोहळ्यात मराठी भाषेवरून केलेल्या टिप्पणीवर सभागृहात चर्चा झाली, पण फारसा वेळ न दवडता. विशेष म्हणजे कामकाजाच्या १६ दिवसांत रोजचे सरासरी कामकाज ९ तास ७ मिनिटांचे झाले. (Assembly Budget Session 2025)
आत्महत्यांच्या प्रश्नावर समजूतदारपणा
दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच, १० मार्चला, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प मांडला आणि त्यानंतर अर्थसंकल्पातील विविध खात्यांवरील तरतुदी आणि सुधारणा, यावर दोन दिवसांत जवळपास ७५ आमदारांनी आपले विचार व्यक्त केले. त्याला अर्थमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिले आणि विरोधकांचे समाधान झाले. याच आठवड्यात होळी आणि रंगपंचमी आणि लागूनच शनिवार-रविवारची सुट्टी आल्याने चार दिवस सगळ्याच आमदारांनी मतदारसंघात सण साजरा केला. मात्र, त्या शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर आणला खरा, पण विरोधी पक्षांनी पवारांचा मुद्दा फार मनावर न घेता, सरकारची बाजू समजून घेतली आणि सहकार्य केले. (Assembly Budget Session 2025)
नागपुरात दंगल; सभागृहात शांतता
तिसऱ्या आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी १७ मार्चला नागपूरच्या दंगलीवरही विरोधकांनी सामाजिक भान ठेवत, समाजा-समाजात तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही कृती केली नाही की सरकारला धारेवर धरले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीही घटनेची गंभीर दखल घेत सभागृहात सविस्तर आणि समाधानकारक उत्तर दिल्याने कामकाज पुढे सुरळीत सुरू झाले. त्यानंतर दोन दिवसात दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात याचिका केली, त्यावर थोडी चर्चा झाली आणि सत्ताधाऱ्यांनीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत गदारोळ सुरू केला. आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत गोंधळ घातला आणि सभागृह काही मिनिटांसाठी तहकूब करण्याची वेळ आली. तेव्हा शिवसेना उबाठाचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता, पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीने (शप) तेव्हाही जागेवरच शांत बसून सहकार्य केले. (Assembly Budget Session 2025)
संवादासाठी विरोधकांची धडपड
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी विरोधी पक्षाकडून एकही अर्ज दाखल न करता निवडणूक बिनविरोध करून एकप्रकारे सरकारला सहकार्य केले. तर अखेरच्या आठवड्यातही विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार न देऊन अजित पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत नवी परंपरा सुरू केली. यावर उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला देण्याची परंपरा असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले पण अजिबात गोंधळ न घालता. उलटपक्षी सत्ताधारी पक्षाने उपाध्यक्ष पदासाठी सहकार्य करण्याबाबत विरोधी पक्षांशी संवाद साधला नाही याची खंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) आणि शिवसेना उबाठाने बोलून दाखवली. (Assembly Budget Session 2025)
(हेही वाचा – IPL 2025, MI vs GT : मुंबई इंडियन्सचा आयपीएलमध्ये सलग दुसरा पराभव, गुजरातने ३६ धावांनी हरवलं)
इतिहासातील समंजस विरोधी पक्ष
सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधायला हवा, असे ठाम मत जनतेच्या नव्हे तर उबाठाच्या मनातील विरोधी पक्ष नेते भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी व्यक्त केले. त्याच्याही पुढे जाऊन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या ‘संविधाना’वरील अधिवेशनातील शेवटच्या भाषणाच्या (राजकीय भाष्य वगळून) पुस्तिका काढाव्या, इतके उत्कृष्ट भाषण झाल्याची पोचपावती मुख्यमंत्र्यांना दिली. (Assembly Budget Session 2025)
एक मात्र नक्की की अनेक याचना करूनही विरोधी पक्ष नेतेपद सरकारकडून देण्यात आले नसल्याबाबत उघड नाराजी जयंत पाटील, नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली पण सहकार्याची वाट सोडली नाही. कदाचित, इतिहासात पहिल्यांदा इतका समंजस विरोधी पक्ष एखाद्या सत्ताधाऱ्यांना मिळाला असावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community