- विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये घोळात घोळ सुरु झाला असून उमेदवारी जाहीर करून त्यांना ए आणि बी फॉर्म दिल्यानंतर त्यांची उमेदवारी बदलण्याची वेळ दोन्ही पक्षांवर आली आहे. काँग्रेसने दोन तर उबाठा शिवसेनेने एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर तिथे उमेदवार बदलून नवीन उमेदवार दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याने तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने जाहीर झालेल्या उमेदवाराला बदलण्याची वेळ दोन्ही पक्षांवर आली आहे. (Assembly Election 2024)
महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेच्यावतीने चोपडा विधानसभेसाठी महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर करत त्यांना ए आणि बी फॉर्म दिला होता. परंतु याला स्थानिक उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी विरोध करताच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तडवी यांची उमेदवारी रद्द करत त्यांच्याकडील ए आणि बी फॉर्म परत घेतला. त्यामुळे त्या तडवी यांच्या ऐवजी उबाठा शिवसेनेने सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Assembly Election : महायुती आणि मविआला बंडखोर नेत्यांचं टेन्शन, नेत्यांची दिवाळी जाणार समजूत काढण्यात)
काँग्रेस पक्षाने अंधेरी पश्चिम मतदारसंघातून आधी सचिन सावंत यांच्या नावाची घोषणा केली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुधारीत यादी जाहीर करून अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये सचिन सावंत यांच्या ऐवजी माजी आमदार अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे या मतदारसंघातून अशोक जाधव यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या विभागातील काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनीही बंडखोरी करत आपल्या उमेदवारा विरोधात बंड पुकारला आहे. (Assembly Election 2024)
तर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने आधी मधुकर देशमुख यांच्या नावाची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर वाढत्या विरोधानंतर देशमुख यांची उमेदवारी रद्द करत त्याठिकाणी लहू शेवाळे यांच्या नावाची घोषणा करत उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे एकदा उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांवर यंदाच्या निवडणुकीत आल्याचे दिसून येत असल्याने या दोन्ही पक्षांमध्ये समन्वय आणि संपर्काचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community