- सचिन धानजी, मुंबई
घाटकोपर विधानसभेतील भाजपाचे आमदार राम कदम यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवून विजयाची हॅट्रीक मारली असली तरी विजयी चौकार मारण्याची संधी त्यांना पक्ष देते की दुसऱ्याला संधी देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यापेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांना १५ हजार मते जास्त मिळाली. भाजपाचे आमदार असूनही कोटेचा हे या घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रात १५ हजार मतांनी पिछाडीवर राहिले. त्यामुळे राम कदम यांचा पत्ता कापून कोणाला उमेदवारी दिली जाईल याबाब तर्कवितर्क लढवले जात असले तरी हा मतदारसंघ आता भाजपाला पुरक नसल्याने भाजपा हा मतदार शिवसेनेसोबत अदलाबदल करते का याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election 2024)
घाटकोपर विधानसभा क्षेत्रात २००९ मध्ये राम कदम हे मनसेच्या या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि सन २०१४ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ४१ हजार आणि २८ हजार मतांनी विजय मिळवला. सन २०१४ मध्ये भाजपा आणि शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवली होती, तरीही भाजपाचे राम कदम यांनी ८० हजार मते मिळाली होती, तर शिवसेनेचे सुधीर मोरे यांना ३८ हजार मते मिळाली होती, तर मनसेच दिलीप लांडे यांना १७ हजार मते मिळाली होती. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षातून Hiraman Khoskarkhoskar यांची हकालपट्टी )
परंतु नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे संजय पाटील यांना ७९ हजार मते तर मिहिर कोटेचा यांना या विधानसभा क्षेत्रामध्ये केवळ ६३ हजारच मते मिळवता आली. या मतदारसंघातील हारुन खान हे शिंदे गटात आले असून किरण लांडगे यांचाही काही भाग या मतदारसंघात आहे. तर भाजपा आणि शिवसेनेचे प्राबल्य असूनही कोटेचा हे या मतदारसंघात पिछाडीवर राहिले. त्यामुळे यंदा राम कदम यांच्यासाठी हा मतदार संघ धोक्याचा ठरला असला तरी भाजपा हा धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळेच राम कदम यांना बदलून नवीन चेहरा देण्याचा विचार केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)
या विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून नवीन चेहरा नसला तरी माजी खासदार मनोज कोटक यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, तसेच उबाठा शिवसेनेकडून संजय भालेराव यांच्या नावाची चर्चा आहे, तर मनसेकडून या मतदारसंघातून गणेश चुक्कल हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे भाजपाला हा मतदार संघ नको असल्यास तसेच भविष्यात शिवसेनेकडून मजबूत उमेदवार उपलब्ध असल्यास ही जागा शिवसेनेला सोडली जाऊ शकते आणि त्या बदल्यात भांडुपची जागा भाजपा आपल्याकडे घेऊ शकते असे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community