Assembly Election 2024 : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसाठी २९३ जणांची माघार, तर १६५ उमेदवार रिंगणात

नायगावमध्ये सर्वांत कमी १० तर उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३ उमेदवार

155
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
  • प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत होती. त्यामुळे ३ वाजेपूर्वी प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या माघारीसाठी मनधरणी सुरू होती. त्यात नऊ मतदारसंघांतून तब्बल २९३ जणांनी माघार घेतली असून आता प्रत्यक्ष रिंगणात १६५ उमेदवार राहणार आहेत. महायुतीच्या बंडखोरांची मनधरणी करण्यात अखेरपर्यंत यश आले नसले तरी महाविकास आघाडीतील बंडोबांनी मात्र तलवारी म्यान केल्या होत्या.

भोकर विधानसभेत सर्वात जास्त अर्ज मागे

जिल्ह्यात किनवट विधानसभा मतदारसंघातून २९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यातील १२ जणांनी माघार घेतल्याने या ठिकाणी रिंगणात आता १७ उमेदवार आहेत. हदगाव मतदारसंघातील ६३ जणांपैकी ३९ जणांच्या माघारीने रिंगणात २४ जण उरले. भोकरमध्ये १४० वैध उमेदवार होते. त्यापैकी तब्बल ११५ जणांनी माघार घेतल्याने रिंगणात २५ उमेदवार आहेत. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार माघारीसाठी प्रयत्न केले जात होते. या मतदारसंघातून ३९ जणांनी माघार घेतली असून ३३ उमेदवार असल्याने येथे तीन बॅलेट मशीन लागणार आहेत. नांदेड दक्षिणमध्ये ५१ पैकी ३१ जणांनी माघार घेतल्याने रिंगणात २० उमेदवार आहेत. लोहा मतदारसंघात ३३ पैकी १९ जणांनी माघार, तर १४ रिंगणात. नायगावमध्ये १६ जणांनी माघार घेतली असून १० जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

राखीव असलेल्या देगलूरमध्ये १६ जणांनी माघार घेतल्याने या ठिकाणी ११ उमेदवार उरले आहेत. तर मुखेड मतदारसंघात १७ जणापैकी ६ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे या ठिकाणी ११ जण रिंगणात उतरले आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत ४५८ उमेदवारांपैकी २९३ जणांनी माघार घेतली असून आता नऊ विधानसभेसाठी १६५ जण रिंगणात आहेत.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : माहीममध्ये गुरु शिष्यामध्येच लढाई)

नांदेड उत्तर आणि दक्षिणमध्ये भाजपाचे बंड

भाजपा बंडखोरांमुळे शिवसेनेला टेन्शन

नांदेड उत्तर किंवा दक्षिण मतदारसंघापैकी एक मतदारसंघ महायुतीत भाजपाला सोडण्याच्या मागणीला यश न आल्यानंतर या दोन्ही मतदारसंघातून भाजपाच्या बंडखोरांनी उमेदवारी दाखल केली होती. नांदेड उत्तरमधून मिलिंद देशमुख तर नांदेड दक्षिणमधून महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या दोघांचीही मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यात यश आले नाही. परिणामी या दोन्ही मतदारसंघात आता शिवसेनेच्या उमेदवारांचे टेन्शन मात्र वाढले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी काँग्रेसच्या डी. पी. सावंत यांचा पराभव केला होता. त्यावेळी कल्याणकर यांना ६२ हजार ८८४ तर सावंतांना ५० हजार ७७८ मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार ८९२ मते एमआयएमला मिळाली होती. त्यावेळी मिलिंद देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु पक्षाकडून पुनर्वसनाचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यानंतर मागील पाच वर्षांपासून ते तयारी करीत होते. ही जागा भाजपाला सोडण्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्नही केले होते. परंतु ही जागा शिवसेनेला सुटल्याने त्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले. सोमवारी शेवटच्या क्षणापर्यंत मिलिंद देशमुख यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेच्या कल्याणकर यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. तर दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरलेले दिलीप कंदकुर्ते यांनी यावेळीही पुन्हा बंडाचे निशाण फडकविले. हा मतदारसंघ भाजपाला सोडवून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यानंतर त्यांनी वर्षावर धाव घेतली होती. शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास त्यांची निश्चित होत आली होती. परंतु ऐनवेळी त्यांच्या उमेदवारीबाबत खोडा घालण्यात आला. त्यामुळे कंदकुर्ते यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे मोहन हंबर्ड यांना ४६ हजार ९६२ मते मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष असलेले कंदकुर्ते यांना ४३ हजार ३५१ मते होती. तर शिवसेनेच्या राजश्री पाटील यांना ३७ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे हा पराभव राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्याचे उट्टे यंदा पाटील यांनी कंदकुर्तेना शिवसेनेची उमेदवारी न मिळू देण्यातून काढले. परंतु आता कंदकुर्ते पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने शिवसेनेच्या आनंद बोंढारकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

(हेही वाचा – Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप)

नायगावमध्ये सर्वांत कमी १० तर उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३ उमेदवार

जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात वेगवेगळ्या लढती होणार असून, अर्ज मागे घेण्याच्या सोमवार, ४ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, चौरंगी याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

नायगावमध्ये सर्वांत कमी १० उमेदवार तर नांदेड उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. अर्ज छाननीमध्ये नऊ विधानसभा मतदारसंघातून तब्बल ५५ अर्ज बाद झाले होते. तर, एकूण ४६० अर्ज वैध ठरले होते. अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वांत जास्त भोकर विधानसभा मतदारसंघात दीडशेपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात छाननीत काही अर्ज बाद झाले. तर, शेवटच्या दिवशी तब्बल ११५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यातील नऊही मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जवळपास प्रमुख उमेदवारामधून लढतीचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकणार हे महत्वाचे आहे.

मतदारसंघनिहाय रिंगणात असलेले उमेदवार

नांदेड उत्तर मतदारसंघ ३३, भोकर २५, हदगाव २४, नांदेड दक्षिण २०, किनवट १७, लोहा १४, मुखेड ११, देगलूर ११, नायगाव १० याप्रमाणे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील लढती

किनवट विधानसभा मतदारसंघात
किनवट विधानसभा भीमराव केराम (भाजपा) विरुद्ध प्रदिप नाईक (राष्ट्रवादी शरद पवार)

हदगाव विधानसभा मतदारसंघ
माधव पाटील जवळगांवकर (काँग्रेस) विरुद्ध बाबुराव कदम शिंदे गट

भोकर विधानसभा मतदारसंघ
श्रीजया चव्हाण (भाजपा) विरुद्ध पपू पाटील कोणढेकर (काँग्रेस)

उत्तर नांदेड विधानसभा मतदारसंघ
बालाजी कल्याणकर (शिवसेना) विरुद्ध अब्दुल सत्तार (काँग्रेस) विरुद्ध संगीता पाटील (शिवसेना उबाठा) विरुद्ध मिलिंद देशमुख (भाजपा बंडखोर)

दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघ
मोहन हंबर्डे (काँग्रेस) विरुद्ध आनंद पाटील बोनदारकर (शिवसेना) विरुद्ध दिलीप कंदकुर्ते (भाजपा बंडखोर)

लोहा विधानसभा मतदारसंघ
लोहा विधानसभा एकनाथ पवार (शिवसेना उबाठा) विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) विरुद्ध आशा शिंदे

नायगाव विधानसभा मतदारसंघ
राजेश पवार (भाजपा) विरुद्ध मिनल खतगावकर (काँग्रेस)

देगलूर विधानसभा मतदारसंघ
जितेश अंतपूरकार (भाजपा) विरुद्ध निवृत्ती कांबळे (काँग्रेस० विरुद्ध सुभाष साबणे (प्रहार)

मुखेड विधानसभा मतदारसंघ
तुषार राठोड (भाजपा) विरुद्ध हणमंत पाटील बेटमोगरेकर (काँग्रेस) विरुद्ध बालाजी खतगावकर (बंडखोर शिवसेना)

या निवडणुकीचे समीकरण कसे राहणार, याची उत्सुकता गत निवडणुकीमध्ये लोह्यात तिरंगी लढत

(हेही वाचा – राहुल गांधींच्या एका हातात लाल पुस्तक, दुसऱ्या हातात अर्बन नक्षलवाद्यांचा गोतावळा – Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)

नोटापेक्षाही कमी मतदान!

शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून परिचित होता. मात्र १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सुरुंग लावल्यानंतर सलग दहा वर्षे मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकत होता. मात्र २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहण्यास मिळाली. त्यात शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहुजन आघाडी उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना होईल असे चिन्ह दिसत असताना निकालाच्या दिवशी मात्र शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे यांनी एकतर्फी विजयाची पताका फडकावली. तर शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे लोहा मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत नेमकी काय समीकरणे होणार हे पुढील काळातच कळणार आहे.

लोहा मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये एकूण २ लाख ४३ हजार २३ मतदार होते. त्यापैकी वैध मतांची संख्या १ लाख ९२ हजार ६९५ होती.

शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला १ लाख १६ हजार ६८ मते मिळाली, तर वंचितचे उमेदवार ३७ हजार ३०६ मते घेऊन दुसऱ्या स्थानावर राहिले होते. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार शामसुंदर शिंदे यांनी ६४ हजार ३६२ मतांची आघाडी घेऊन मोठ्या फरकाने वंचितचे उमेदवार शिवकुमार नरंगले यांचा पराभव केला होता. तर ३० हजार ९६५ मते घेऊन शिवसेनेचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. मात्र २०२४ विधानसभा निवडणूक चौरंगी किंवा पाचरंगी होण्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

२०१९ मधील प्रमुख उमेदवार

१) श्यामसुंदर शिंदे शेतकरी कामगार पक्ष २०१६६८

२) शिवकुमार नरंगले वंचित ३७३०६

३) मुक्तेश्वर धोंडगे शिवसेना ३०९६५

विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक

नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेसोबतच लोकसभेची निवडणूक देखील होऊ घातली आहे. दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या अकालीनिधनामुळे या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होत आहे. सहानुभूतीच्या लाटेवरती दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रविंद्र चव्हाण स्वार झाले असल्यामुळे आणि राज्यात विधानसभा निवडणूक असल्यामुळे लोकसभा काहीशी झाकोळली गेली आहे.

नांदेड लोकसभेसाठी वैध उमेदवार :

रविंद्र वसंतराव चव्हाण इंडियन नॅशनल काँग्रेस, संतुकराव मारोतराव हंबर्डे भारतीय जनता पार्टी, अॅड. अलताफ अहेमद इंडियन नेशनल लीग, अविनाश विश्वनाथ भोसीकर वंचित बहुजन आघाडी, कल्पना संजय गायकवाड बुलंद भारत पार्टी, खमर बिन बदर अलजाबरी ऑल इंडिया मजलिस ए इंकीलाब ए मिल्लत, गंगाधर भांगे राष्ट्रीय समाज पक्ष, नागोराव दिगंबर वाघमारे जनहित लोकशाही पार्टी, राजू मधुकर सोनसळे रिपब्लिकन सेना, विष्णु मारोती जाधव राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टी, सय्यद सैदा नवरंग काँग्रेस पार्टी, अब्दुल सलाम सल्फी, कंटे सायन्ना, गजभारे साहेबराव भिवा, चालीका चंद्र शेखर, मधुकर किशनराव क्षिरसागर, मन्मथ माधवराव पाटील, यादव धोंडीबा सोनकाबळे, संभाजी दशरथ शिंदे असे ८ अपक्ष मैदानात आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.