Assembly Election 2024 : मालाडमधून शेलारांना उमेदवारी, अस्लमसाठी फुलटॉस की यॉर्कर ?

185
Assembly Election 2024 : मालाडमधून शेलारांना उमेदवारी, अस्लमसाठी फुलटॉस की यॉर्कर ?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

एकाच घरातील दोन सदस्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देता येणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या भाजपाने पहिल्याच यादीत शेलार बंधूंना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम येथील विद्यमान आमदार असून त्यांचे बंधू माजी नगरसेवक विनोद शेलार यांना मालाडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्याच यादीत भाजपामधील कट्टर पदाधिकाऱ्यांना हा न्याय दिला जात असला तरी भाजपात बाहेरुन आलेल्यांना मात्र एका घरात एकच उमेदवारी हाच नियम ठेवल्याचे दिसून येत आहे. (Assembly Election 2024)

आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती असून भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीमध्ये वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आणि मालाड पश्चिममधून विनोद शेलार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मालाडमधून माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपाचे पदाधिकारी सुनील कोळी आणि विनोद शेलार यांच्या नावांची चर्चा होती. परंतु शेलार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Temple Federation : श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे षड्यंत्र)

मालाड मतदारसंघातून काँग्रेसचे अस्लम शेख हे २००९ पासून निवडून येत असून सन २०१४मध्ये या मतदारसंघातून भाजपाचे राम बारोट यांनी अस्लम शेख यांना टक्कर दिली होती. अगदी २३०३ मतांनी अस्लम शेख यांना विजय मिळवता आला होता. भाजपाचा काठावर पराभव या मतदारसंघात झालेला असल्याने सन २०१९च्या निवडणुकीत भाजपाने माजी आमदार रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकी अस्लम शेख यांचा १० हजार मतांनी विजय झाला होता. अस्लमे शेख यांना ७९ हजार ४९४ मते तर रमेश सिंह ठाकूर यांना ६९ हजार ०९२ मतदान झाले होते. (Assembly Election 2024)

त्यामुळे मागील काही वर्षांपासून विनोद शेलार आणि सुनील कोळी यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रात बांधणी सुरु होती. त्यामुळे शेलार आणि कोळी यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस होती. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत कोळी हे इच्छुक राहिले असून प्रत्यक्षात त्यांना उमेदवा न मिळता त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. मात्र, प्रत्येक वेळी सुनील कोळी यांच्या पदरी निराशा पडत असली तरी प्रत्येक वेळी ते पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार तेवढ्याच जबाबदारी करत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत असतात. शेलार यांना उमेदवारी देण्यात आल्याने अस्लम शेख यांच्यासमोरील डोकेदुखी कमी झाली असून अस्लम शेख यांच्यासमोर गोपाळ शेट्टी असते तरच त्यांना आव्हान निर्माण झाले असते. त्यामुळे शेलारांच्या उमेदवारीमुळे अस्लम शेख यांना फुलटॉस दिल्याची चर्चा रहिवाशांमध्ये असून हा शेलारांचा हा फुलटॉस अस्लम शेख साठी यॉर्कर ठरतो का याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.