-
विशेष प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. आदर्श आचारसंहिता आठवडाभरावर आली. त्यामुळे नुकताच सुरू झालेला ‘आयाराम-गयाराम’चा खेळ येत्या आठवड्यात जोर धरेल, अशी चिन्हे आहेत.
दहा वर्षात कॉंग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी प्रवास
इंदापुरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची साथ सोडून ‘तुतारी’ हातात धरण्याचा निर्णय जाहीर केला. २०१४ आणि २०१९ मध्ये ज्या पक्षांकडून पाटील पराभूत झाले त्यांच्याच गटात जाणे पाटील यांनी पसंत केले. २०१४ मध्ये पाटील यांनी कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) लढवली होती तर २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश करत भाजपाकडून उमेदवारी मिळवली होती. मात्र दोन्ही वेळेस एकसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्तात्रय भरणे यांच्याकडून त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.
भाजपाकडून पाटील यांना विधान परिषदेची ‘ऑफर’ होती, मात्र त्यांची इच्छा विधानसभेची निवडणूक (Assembly election 2024) लढवण्याची असल्याने ही ऑफर नाकारल्याचे समजते. इंदापूर मतदारसंघातून दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार असून त्यांनी गेल्या दोन वेळेस पाटील यांचा पराभव केला आहे. सध्या भरणे हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत असून महायुतीत असल्याने विद्यमान आमदारचे तिकीट कापून भाजपाकडून पाटील यांना उमेदवारी देणे, महायुतीला अडचणीचे ठरणारे होते. अखेर पाटील यांना आपला ‘मार्ग’ बदलणे भाग पडले. आता इंदापुरची जनता आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील स्थानिक नेते पाटील यांना स्वीकारतील का? हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.
(हेही वाचा – Hindu status : हिंदू धर्माबाबत स्टेटस ठेवले म्हणून अंकितला मारहाण; शाहिद, अयान, हसनैनने दिली जीवे मारण्याची धमकी)
‘या’ राष्ट्रवादीतून ‘त्या’ राष्ट्रवादीत
शुक्रवारी ४ ऑक्टोबर २०२४ ला पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली आणि सूत्रांकडून नाही तर आपणच ही घोषणा करत आहोत, असे जाहीर केले. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये हर्षवर्धन पाटील एकटेच नाहीत तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील माढाचे आमदार बबन शिंदे यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन ‘गटबदल’ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
‘पुरस्कृत’ उमेदवारीसाठी
मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातील अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी याची कन्या, अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी या शिवसेना उबाठा गटाच्या संपर्कात असून भायखळा मतदारसंघातून उबाठा पुरस्कृत किंवा उबाठामध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. उबाठाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी दगडी चाळीत जाऊन गीता गवळी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे तर गवळी देखील भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे समजते. मुंबईतील वांद्रे पूर्वचे विद्यमान कॉंग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनीही नुकताच कॉंग्रेसचा ‘हात’ सोडत अजित पवार (Ajit Pawar) यांचे ‘घड्याळ’ हातात बांधले. येत्या आठवड्यात अशाच प्रकारे कुणी निवडणूक तिकीटांसाठी तर कुणी ‘राजकीय तडजोड’ म्हणून पक्ष बदलल्याचे चित्र समोर येईल.
(हेही वाचा – Urdu Teachers Association : उर्दू शाळेत नव्या गणवेशाला विरोध, उर्दू शिक्षक संघटनेचा मनमानी कारभार)
राजकीय तडजोड
भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हेदेखील विधानसभा निवडणूक (Assembly election 2024) लढण्यास इच्छूक आहेत. मात्र आधीच नारायण राणे हे भाजपाचे खासदार असून भाऊ नितेश राणे आमदार असल्याने निलेश राणे यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तिकीट दिले तर घराणेशाहीचा शिक्का भाजपावर बसून विरोधकांना टीका करण्यास ‘आयते कोलीत’ मिळेल. यासाठी निलेश यांना महायुतीतील शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षातून तिकीट देण्यासाठी नारायण राणे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. यासाठी राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेटही घेतल्याची चर्चा आहे. पक्ष बदल म्हणजे केवळ ‘राजकीय तडजोड’ असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
कुठून आला ‘आयाराम-गयाराम’ शब्द?
१९६७ मध्ये हरियाणाचे आमदार गयालाल यांनी एकाच दिवसात तीनदा पक्ष बदलला. आधी त्यांनी काँग्रेसचा त्याग करत जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर काही वेळातच ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. सुमारे ९ तासांनंतर त्यांचे मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा जनता पक्षात प्रवेश केला. बरं, गयालाल यांचे मन बदलले आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये परत आल्यानंतर तत्कालीन काँग्रेस नेते राव विरेंद्र सिंह त्यांना चंदीगडला घेऊन गेले आणि तेथे पत्रकार परिषद घेतली. तेव्हा राव विरेंद्र म्हणाले होते की, ‘गया राम आता आया राम झाले आहेत.’ या घटनेनंतर ‘आया राम, गया राम’ हा वाक्प्रचार केवळ भारतीय राजकारणातच नाही तर सामान्य जीवनातही पक्षांतर करणाऱ्यांसाठी वापरला जाऊ लागला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community