Assembly Election : हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात मत विभाजनाची भीती; अपक्षांनी केली डोकेदुखी

65
  • प्रतिनिधी

हिंगोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, काही मतदारसंघांत अपक्ष तर काही मतदारसंघात बंडखोर उमेदवारांमुळे प्रस्थापितांसमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. अपक्ष आणि बंडखोरांच्या उमेदवारीची भीती तिन्ही मतदारसंघांत कायम आहे. काहीही झाले, तरी सरळ वाटणाऱ्या निवडणुकीत आता ‘ट्विस्ट’ तयार झाला आहे. त्यामुळे चुरशीच्या लढती होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच अनेकांनी मैदानात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे बंडखोर, अपक्षांची संख्या वाढणार, असे दिसत होते. महायुती आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते मंडळींसमोर आव्हान निर्माण झाले होते. पक्षातून बंडखोरी करीत दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी वरिष्ठांनी प्रयत्नही केले. त्याला थोडे-फार यश आले. मात्र, हिंगोली आणि कळमनुरी या दोन मतदारसंघांत बंडखोरी कायम आहे, तसेच अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे. सुरुवातीला सरळ-सरळ वाटणाऱ्या या लढती आता तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी होतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे मतविभाजन अटळ आहे. हे मतविभाजन कोणाच्या फायद्याचे ठरते आणि कोणासाठी डोकेदुखी, हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – शिवसेना उबाठा पक्षातून माजी खासदार Subhash Wankhede यांची हकालपट्टी)

हिंगोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण २३ उमेदवारांपैकी १० जण अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. विशेष म्हणजे, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे बंडखोरी झाली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव गोरेगावकर हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महायुतीमधील भाजपाचे लोकसभा प्रभारी असणारे रामदास पाटील यांनी भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. या दोन्ही उमेदवारांचा फटका प्रस्थापितांना सहन करावा लागेल, असे सध्यातरी दिसते, याशिवाय वंचित बहुजन आघाडीनेही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे तिरंगी किंवा चौरंगी लढत होईल, असे चित्र आहे. कळमनुरी मतदारसंघातही बंडखोरी झाली आहे. उद्धवसेनेच्या वतीने डॉ. संतोष टारफे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, उबाठा सेनेचेच अजित मगर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत निवडणुकीत रिंगणात उडी घेतली आहे. सुरुवातीला शिवसेना विरुद्ध उबाठा अशी लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मगर यांच्या अपक्ष उमेदवारीने गणिते बदलू शकतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित मगर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. मगर हे यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, शिवाय वंचित बहुजन आघाडीही निवडणुकीच्या आखाड्यात आहे. त्यामुळे या मतदारसंघातही मतविभाजनाची भीती कायम आहे. (Assembly Election)

वसमतमध्येही लढत होणार चुरशीची
  • वसमत मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये झालेली बंडखोरी थंड करण्यात श्रेष्ठींना यश आले आहे.
  • दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघात आमनेसामने आहेत.
  • मात्र, जन सुराज्य शक्त्ती पक्षातर्फे गुरू पादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, वंचित बहुजन आघाडीही मैदानात आहे.
  • या ठिकाणीही मत विभाजनाचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • त्यामुळे वसमतमधील लढतही चुरशीची होईल असे दिसते.
जरांगे फॅक्टरचीही धास्ती

मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत उमेदवार उभे करणार नसल्याचे जरी सांगितले असले तरी मराठा आरक्षणाची धग संपूर्ण मराठवाड्यात पहावयास मिळत आहेत.

अपक्षांमुळे डोकेदुखी वाढली…

हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून, तिन्ही जागांवर तुल्यबळ निवडणुका होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने आहेत. जास्तीत जास्त जागा आपल्याच ताब्यात रहाव्यात, यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांची मंडळी ताकद लावत आहे. त्यामुळे आधीच या निवडणुका चुरशीच्या झाल्या आहेत. दुसरीकडे यावेळच्या निवडणुकीत अनेक अपक्षांनीही या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तसेच काही जण प्रादेशिक पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे यावेळेस प्रथमच तिन्ही मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढली आहे.

हिंगोली विधानसभा मतदारसंघात यावेळेस २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये १० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तसेच राज्यस्तरावरील नोंदणीकृत राजकीय पक्षांचे ९ उमेदवार ही निवडणूक लढवित आहेत. (Assembly Election)

विशेष म्हणजे, २०१९ च्या निवडणुकीत केवळ १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अशीच परिस्थिती कळमनुरी विधानसभा मतदारसंघात देखील आहे. या वेळेस १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये १० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे ३ आणि नोंदणीकृत राजकीय पक्षांचे ६ उमेदवार या मतदारसंघात नशीब अजमावत आहेत.

(हेही वाचा – BSE President Resigns : बीएसई कंपनीचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांचा राजीनामा)

वसमत विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाचे ३, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे ३ आणि ५ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. यावेळच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढल्याने प्रस्थापितांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. आमदारकीच्या निवडणुकीत अपक्षांनी प्रस्थापितांसमोर हे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार किती मतदान घेतात व किती ताकद लावतात, त्यावरून निवडणुकीतील चुरस वाढत जाणार आहे. सध्या तरी अपक्षांसह सर्वच उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क वाढविला असून, दररोज प्रचार दौरे होत आहेत.

२०१९ मध्ये होते १३ अपक्ष उमेदवार
  • २०१९ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस उमेदवारांची संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात ३४ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. यावेळेस ५३ उमेदवार आहेत.
  • विशेष म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत १३ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळेस २५ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
  • त्यामुळे अपक्ष म्हणून आमदारकीचे नशीब अजमावणाऱ्या उमेदवारांमुळे लढत अधिक चुरशीची झाली आहे.
बंडखोरी देखील वाढली

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी ३ घटक पक्ष आहेत. त्यामुळे तीनपैकी अधिकृत कोणत्याही एकाच पक्षाला उमेदवारी मिळाली.

  • मात्र इतर घटक पक्षांतूनही काही जण इच्छुक होते.
  • त्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशी परिस्थिती सर्वच मतदार- संघात आहे.

त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यात काहींनी अपक्ष म्हणून तर काहींनी इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.

प्रचाराच्या रणधुमाळीत हरपला विकासाचा मुद्दा

हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे प्रचारातून गायब झाले असून, आरोप-प्रत्यारोपांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांवर कोणी बोलणार की नाही ? असा प्रश्न मतदार उपस्थित करीत आहेत.

दिवाळीचा सण संपल्यानंतर सगळ्याच उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी सभांवर भर दिला आहे. मतदारसंघातील गावा-गावात सध्या सकाळपासूनच प्रचाराचा धुराळा उडत आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघात प्रस्थापितांविरुद्ध अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. ग्रामीण भागात प्रचार आता शिगेला पोहोचला असून, पहाटेपासूनच उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते मतदारांशी थेट संपर्क साधून आपली बाजू मांडत आहेत. सभा आणि बैठकांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. परंतु, जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा घेऊन कोणीच बोलायला तयार नाही. (Assembly Election)

(हेही वाचा – Muslim : मुस्लिम मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाच्या दिवशी निकाह न लावण्याचा काझीचा निर्णय)

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती होऊन २५ वर्षांचा कालावधी लोटला आहे मात्र अजूनही रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध नाहीत. मोठे उद्योग व्यवसाय उभारले नसल्याने जिल्ह्याचे अर्थकारणही वाढले नाही. उद्योग व्यवसाय नसल्याने येथील युवकांना इतर जिल्ह्यात स्थलांतर करावे लागते.

शिक्षण आणि आरोग्याचाही प्रश्न गंभीर आहे. मात्र या प्रश्नांवर बोलण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. ठिकठिकाणी होत असलेल्या प्रचारांतून आरोप-प्रत्यारोप मात्र होऊ लागले आहे. एकंदर विकासाचा मुद्दा प्रचारातून हरपल्याची जाणीव मतदारांना होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न गंभीर

जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. वसमत वगळता इतर तालुक्यांमध्ये सिंचन सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. त्यामुळे शेतीच्या समस्या निर्माण होतात.

जमीन कसदार असतानाही उत्पादन हातात पडत नाही. त्यामुळे शेतकयांसमोर बाराही महिने संकटांची मालिंका कायम राहते. त्यामुळे सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. मात्र सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी, वर्षानुवर्षापासून निर्माण झालेला अनुशेष दूर करण्यासाठी ठोस आराखडा मांडणे गरजेचे आहे. मात्र प्रचारामध्ये हा मुद्दाही फारसा पुढे येत नाही. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.