- प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘तुतारी’ला फटका बसला होता. ट्रम्पेट चिन्हामुळेच सातारा लोकसभेत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीतही ट्रम्पेट चिन्हामुळे ‘तुतारी’च्या ९ उमेदवारांना थोडक्या मतांनी पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पराजयाचे पूर्ण खापर ट्रम्पेटवर फोडले जात आहे. (Assembly Election Result 2024)
लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीनं निवडणूक आयोगाकडे धाव घेत चिन्ह गोठवण्याची विनंती केली होती. मात्र, आयोगाने मराठीतील ‘तुतारी’ हे नाव काढून इंग्लिशमध्ये ‘ट्रम्पेट’ असंच ठेवत चिन्ह गोठवले नाही. (Assembly Election Result 2024)
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण १६३ ठिकाणी अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळालं होतं. यामध्ये ७८ ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होते. पण, ९ ठिकाणी थोडक्या मतांनी ‘तुतारी’च्या उमेदावारांना ट्रम्पेटमुळे पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे. (Assembly Election Result 2024)
(हेही वाचा – Special Editorial : उतू नका, मातू नका… हिंदुत्वाचा वसा सोडू नका!)
कोणते आहेत हे मतदारसंघ ?
माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा जालन्यातील घनसावंगी येथे २,३०९ मतांनी पराभव झाला त्यांच्या समोर ट्रम्पेटला ४,८०० मते मिळाली. खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पारनेरमध्ये १,५२६ मतांनी पराभव झाला तर ट्रम्पेटला ३,५८२ मते मिळाली. परांड्यातून तानाजी सावंत यांच्या विरोधातील उमेदवार राहुल मोटे यांना १,५०९ मते मिळाली तर ट्रम्पेटला ४४४६ मते मिळाली. आंबेगात दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात उमेदवार देवदत्त निकम यांचा १,५२३ मतांनी पराजय झाला तर ट्रम्पेटला २,९५६ मते मिळाली. परभणीतील जिंतूर विधानसभा मतदारसंघात विजय भांगळे ४,५१६ मतांनी पराभूत झाले तर ट्रम्पेटला ७,४३० मते मिळाली. ठाण्यातील शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा यांचा १,६७२ मतांनी पराजय झाला तर ट्रम्पेटला ३,८९२ मते मिळाली. तर ठाण्यातीलच बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक यांचा ३७७ मतांनी पराभव झाला तर ट्रम्पेटला २८६० मते मिळाली. मुंबईतील अणुशक्ती नगर तसेच बीडच्या केजमध्ये देखील हजार ते दोन हजार मतांनी पराजय झालेला पहावयास मिळतो. (Assembly Election Result 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community