- प्रतिनिधी
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उबाठामध्ये होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा अक्षरशः ठप्प झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि उबाठामध्ये विदर्भातील जागांवरून सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असल्याने जागावाटपाची चर्चा पुढे जाऊ शकलेली नव्हती. दरम्यान, जागा वाटपामध्ये आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी मोठा निर्णय घेत जागावाटपामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना बाजूला करून आता समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर मातोश्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
(हेही वाचा – ठरलं तर! Nilesh Rane तब्बल २० वर्षांनी धनुष्यबाण हातात घेणार, कुडाळमधून लढणार?)
निर्णय होईपर्यंत उमेदवार जाहीर करणार नाही
बाळासाहेब थोरात यांच्याकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत यादीही काँग्रेसकडून प्रसिद्ध केली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.
समन्वयाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर दिल्यानंतर महाविकास आघाडी मधील जागा वाटपाचा तिढा सुटतो की वाढतो याकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये मध्यस्ताची भूमिका शरद पवार बजावणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील विशिष्ट पूर्व विदर्भातील १४ जागांवरून शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पूर्व विदर्भात नाना पटोले यांच्या समर्थकांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच नाना पटोले (Nana Patole) यांनी पूर्व विदर्भातील या जागांसाठी जास्त आग्रह धरला होता. आता समन्वयाची मुख्य जबाबदारी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर दिल्यामुळे यावर लवकरच तोडगा काढला जाणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community