Assembly Election : विधानसभेचा चेहरा उद्धव ठाकरेच, शरद पवारांनी दिले संकेत

169
Assembly Election 2024 : मातोश्री पुढे आता सिल्वर ओकचे वजन वाढत आहे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार ? याबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीत खलबतं सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा कोण असेल ? याबाबतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खल सुरु आहेत. महायुतीचा प्रमुख चेहरा कोण असेल ? याबाबत महायुतीच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीचा प्रमुख चेहरा असावेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजित पवार तर शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच महायुतीचा प्रमुख चेहरा असावा, त्यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. महायुतीचा प्रमुख चेहरा कोण असेल ते अजून स्पष्ट होणं कठीण असलं तरी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख चेहऱ्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. “आम्हाला राज्यात परिवर्तन आणायचं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनने सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – Waqf Board : विधेयकाला काँग्रेसचा विरोध म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा)

शरद पवार यांनी सांगितली लोकसभेची आठवण

“जनमानस वेगळा होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ४ आणि काँग्रेसची केवळ १ लोकसभेची जागा होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली. उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत लोकसभेच्या ४८ पैकी ३१ जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे होते”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“आता विधानसभा निवडणूक (Assembly Election) आहे. ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत. अंदाज घेत आहेत. ठिकठिकाणी हेच चित्र दिसत आहे. लोकांना बदल पाहिजे. एखाददुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचे उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पाहिले. सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“एनसीपी, काँग्रेस, शिवसेनेने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकं साथ देतील. लोकांच्या मनात काम करणारे जाणकार त्यांच्यासाठी पक्ष शोधत आहेत. दोन महिने हातात आहेत. त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा. शेवटच्या माणसापर्यंत जा, आपली विचारधारा पटवून द्या”, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.