Assembly Elections : पालघर जिल्ह्यातील मतदारसंघात कोण मारणार बाजी?

191
Assembly Elections : पालघर जिल्ह्यातील मतदारसंघात कोण मारणार बाजी?
  • सुप्रिम मस्कर

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सर्वत्र बहुरंगी लढत होत असल्याचे दिसते. विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर, वसईत सात, नालासोपाऱ्यात १२, पालघरमध्ये नऊ, विक्रमगडमध्ये ११ आणि डहाणू विधानसभेत ८ उमेदवारांमध्ये लढत आहे. तसेच बोईसर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Assembly Elections)

कुठल्या विधानसभेत कोणत्या पक्षाचा उमेदवार?

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभेत महायुतीतील भाजपाने डहाणू, विक्रमगड, नालासोपारा, वसई या ४ जागांवर, शिवसेनेने पालघर आणि बोईसर या २ जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेने (उबाठा) पालघर आणि बोईसर या २ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) ने विक्रमगडच्या एका जागेवर, काँग्रेसने नालासोपारा आणि वसई या २ जागांवर आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू येथे उमेदवार दिला आहे. तसेच स्थानिक पक्ष बहुजन विकास आघाडीने पालघर व्यतिरिक्त पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. तर मनसेने वसई सोडून इतर ५ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. याव्यतिरिक्त बहुजन समाज पार्टीने पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात उमेदवार दिले आहेत. तसेच जिजाऊ विकास पार्टीने विक्रमगड, बोईसर, व डहाणू येथील अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. (Assembly Elections)

(हेही वाचा – लोक जमिनी विकून, नोकऱ्या सोडून तयार झाले होते; मनोज जरांगेंच्या निर्णयावर Rajaratna Ambedkar नाराज)

पालघर जिल्ह्यातील विधानसभेनुसार उमेदवार

पालघर जिल्ह्यात नालासोपारा, वसई, बोईसर, डहाणू, पालघर, विक्रमगड हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात नालासोपारा विधानसभेत संदीप पांडे (काँग्रेस), राजन नाईक (भाजपा), विनोद मोरे (मनसे), क्षितीज ठाकूर (बविआ), धनजंय गावडे (प्रहार जनशक्ती पक्ष) हे उमेदवार आमनेसामने आहेत. तर वसई विधानसभेत स्नेहा दुबे (भाजपा), विजय पाटील (काँग्रेस), हितेंद्र ठाकूर (बविआ) हे उमेदवार आमनेसामने आहेत. विक्रमगड विधानसभेत सुनील भुसारा (राष्ट्रवादी श.प), हरिश्चंद्र भोये (भाजपा), सचिन शिंगडा (मनसे), हेमंत खुताडे (बविआ) हे उमेदवार आमनेसामने आहेत. पालघर विधानसभेत जितेंद्र दुबळा (शिवसेना-उबाठा), राजेंद्र गावित (शिवसेना), नरेश कोरडा (मनसे) हे आमनेसामने आहेत. बोईसर विधानसभेत विश्वास दळवी (शिवसेना-उबाठा), विलास तरे (शिवसेना), शैलेश भूतकडे (मनसे), राजेश पाटील (बविआ) हे उमेदवार आमनेसामने आहेत. तर डहाणू विधानसभेत विनोद निकोले (माकाप), विनोद मेढा (भाजपा), विजय वाढिया (मनसे) संतोष ठाकरे (बसपा) हे उमेदवार आमनेसामने आहेत. यातील अनेक मतदारसंघात मुख्य लढत ही याचं उमेदवारांमध्ये होणार आहे. (Assembly Elections)

नालासोपऱ्यात चौरंगी लढत

नालासोपारा मतदारसंघ हा पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असून ६ लाख ८ हजार ५२६ मतदार आहेत. या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर विद्यामान आमदार आहेत. मात्र भाजपाने उत्तर भारतीय मतपेढी बांधत राजन नाईक यांना रिंगणात उतरवले आहे. तर धनंजय गावडे हे प्रहार जनशक्तीकडून निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी ही शिवसेना (उबाठा) च्या शाखाध्यक्षांसह, पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवले आहे. त्याशिवाय काँग्रेसचे या मतदारसंघात अस्तित्व नसतानाही संदीप पांडे काँग्रेसकडून रिंगणात आहेत. मात्र उत्तर भारतीय मतदार कुणाच्या पाठिशी उभे राहतात. यावर लढत चौरंगी होणार की दुहेरी हे ठरेल. (Assembly Elections)

(हेही वाचा – नक्षलवाद्यांची मदत घेण्यासाठी राहुल गांधींच्या हाती लाल पुस्तक; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)

वसईत तिरंगी लढत

वसई विधानसभेत ३ लाख ५४ हजार ६५२ मतदार आहेत. त्यात वसई विधानसभेत एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. मात्र त्यापैकी तीन उमेदवारांची चर्चा आहे. त्यात बविआचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर, काँग्रेसकडून विजय पाटील आणि भाजपाकडून स्नेहा दुबे, बसपातर्फे विनोद तांबे रिंगणात आहेत. या मतदारसंघात सर्वधर्मीय मतदार आहेत. त्यात ख्रिस्ती धर्मियांची संख्या ही अधिक आहे. तसेच वसई पूर्वेला उत्तर भारतीय मतदारही आहेत. त्यामुळे या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षातर्फे वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जवळील आणि मतदारसंघातील स्थानिक अशासकीय संघटनांशी जनसंपर्क असलेला आमदार या मतदारसंघात निवडून येईल.(Assembly Elections)

पालघर विधानसभेत अस्तित्त्वाची लढाई

पालघर विधानसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिगणात असले तरी प्रमुख लढत ही शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि त्यांचे साडू शिवसेना (उबाठा) चे जयेंद्र दुबळा यांच्यात मानली जाते. शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार अमित घोडा यांनी माघार घेतल्याने लढतीतील रंगत कमी झाल्याचे दिसून येते. मात्र मनसे आणि इतर अपक्ष उमेदवार किती मते घेतात त्यावर लढतीतील चुरस अवलंबून राहणार आहे. त्यात पालघरचे राजेंद्र गावितांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. कारण याआधी ते पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कट करत भाजपाने हेमंत सावरा यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडूनही आले. त्यावेळी शिवसेनेवर नाराजी दाखवत गावितांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता विधानसभेला त्यांनी पुन्हा घरवापसी करत शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. त्यामुळे राजेंद्र गावितांसाठी ही अस्तित्त्वाची लढाई आहे. (Assembly Elections)

(हेही वाचा – BMC : प्रत्येक वॉर्डला स्वतंत्र शहर गृहित धरुन शहराच्या विकासाचे नियोजन करा, आयुक्तांचे विभागाला निर्देश)

विक्रमगडमध्ये तिंरगी लढत पण इतर उमेदवारांना मिळणारी मते निर्णायक

विक्रमगड मतदारसंघात राष्ट्रवादी (श.प) चे विद्यमान आमदार सुनील भुसारा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजपातर्फे हरिश्चंद्र भोये व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम (अपक्ष) यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. मात्र मनसेचे सचिन शिंगडा, बविआचे हेमंत खुताडे यांना मिळणारी मते निर्णायक ठरणार आहेत. या मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात असून एकंदर मतदान आणि मतांची विभागणी निकालात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (Assembly Elections)

बोईसरमध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा आणि बविआ

बोईसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी उमेदवार रिंगणात आहेत, तरी इथे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. बहुजन विकास आघाडीचे विद्यामान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून माजी आमदार विलास तरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शिवसेना (उबाठा) कडून डॉ. विश्वास वाळवी हे ही रिंगणात आहेत. त्यात शिवसेनेतील जगदीश धोडी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दि. ४ नोव्हेंबरला त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांना शिवसेनेचे उपनेते पद देण्यात आले. तरीही महायुतीच्या पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्याची आपल्या उमेदवाराबाबतची भूमिका तसेच प्रचारात सहभाग, नाराज घटकांची भूमिका याकडे मतदारसंघात लक्ष राहणार आहे. (Assembly Elections)

(हेही वाचा – Naresh Mhaske यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – एकनाथ शिंदे निवडणुक… )

डहाणूत माकप विरुद्ध भाजपा आमनेसामने

डहाणू विधानसभा मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात असून माकपचे विद्यमान आमदार विनोद निकोले तर भाजपाकडून विनोद मेढा यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्षांची भूमिका, अंतर्गत गटबाजी यावर निकाल लागू शकतो. तसेच बविआ, मनसे आणि इतर अपक्षांच्या मत विभागणीवर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.