आमदार फुटण्याच्या भीतीने विधानसभा अध्यक्ष निवडणूक टाळली! काँग्रेस नाराज, महाआघाडीत बिघाडी!!

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शेवटपर्यंत घेतलीच नाही. त्यामुळे काँग्रेस कमालीची नाराज झाली असून अधिवेशनानंतर काँग्रेसची ही नाराजी सेना आणि एनसीपीला भारी पडणार आहे.

दोन आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीशिवाय पार पडले. त्याआधी काँग्रेसने अधिवेशनाच्या शेवटी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करा आणि काँग्रेसलाच हे पद द्या, असा ठेका धरला. त्याला समंती दर्शवलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटपर्यंत ही  निवडणूक घेतलीच नाही. त्यामुळे काँग्रेस कमालीची नाराज झाली असून अधिवेशनानंतर मात्र काँग्रेसची ही नाराजी सेना आणि एनसीपीला भारी पडणार आहे. ही निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावी लागणार होती, त्यामुळे आमदार फुटून सरकार धोक्यात येण्याची भीती वाटल्याने सेना-एनसीपीने ही निवडणूकच टाळली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अधिवेशन संपताच काँग्रेसने दर्शवली नाराजी!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुसीमुळे आणि आमदार फुटण्याच्या भीतीने अध्यक्ष निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जरी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी देखील या पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद वाढत चालले आहे. हे अंतर्गत मतभेद अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पहायला मिळत होते. काँग्रेसकडून फक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच सभागृहात विरोधकांना कोंडीत पकडताना दिसत होते. बाकी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मात्र संपूर्ण अधिवेशनात सरकारवर टीका होत असताना मौन धारण करणे पसंत केले आहे. विशेष बाब म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर ठाकरे सरकारने घेतलेल्या पत्रकार परिषदेकडे काँग्रेसने पाठ फिरवल्याचे देखील पहायला मिळाले होते. एवढेच नाही तर बजेटनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे मंत्री सहभागी नव्हते.

आम्ही सर्व एकत्र आहोत. एकत्र येऊन विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा निर्णय घेऊ!
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादीचा विधानसभा अध्यक्षपदावर डोळा!

एकीकडे काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्षपदासाठी आग्रही असताना राष्ट्रवादीचा देखील यावर डोळा आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आता बघू चर्चेनंतर ठरवू. व्हेकन्सी झालेली आहे, आता सगळेच पक्ष त्याच्यावर चर्चा करु शकतात, असे सांगत सूचक विधान केले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील डोळा असल्याने काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष निवडावा, अशी भूमिका घेतली होती. मात्र तिन्ही पक्षांतील अंतर्गत मतभेद बघता अध्यक्ष निवडीवेळी आमदार फुटून ठाकरे सरकारची नाचक्की होऊ नये, म्हणून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊ शकली नाही.

(हेही वाचा : 1 मार्चपासून आमदारांचे वेतन पूर्ववत होणार! आमदार निधी आता 4 कोटींवर!)

शिवसेनेने काढला व्हीप!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेने तर आमदारांसाठीव्हीप जारी केला असल्याची चर्चा देखील सुरू होती. पुढील दोन दिवस सेनेच्या सर्व आमदारांना सभागृहात हजर राहणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत होते.

ही नावे आहेत चर्चेत!

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी यासाठी कॉंग्रेस आग्रही असतानाच काँग्रेस पक्षाच्या वतीने या पदासाठी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्याच वेळी काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांच्यासह कदाचित एखाद्या कॅबिनेट मंत्र्याला त्याचा मंत्री पदाचा राजीनामा घेऊन विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची संधी देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here