हिवाळी अधिवेशनाचे दोन दिवस बाकी असूनही अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय अजूनही प्रलंबित आहे. त्यातच आता ही निवडणूक आवाजी मताने न घेता गुप्त मतदानाने घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्याची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. रविवारी सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांना भेटले आणि त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर स्वाक्षरी करण्याची मागणी केली, तेव्हा राज्यपालांनी यावर निर्णय घेण्यास वेळ मागितला असल्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुन्हा सरकार आले राज्यपालांकडे
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनाची पायरी चढली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली आहे. आज महाविकास आघाडीचे नेते शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांनी चर्चा केली.
(हेही वाचा विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत राज्यपालांचा हस्तक्षेप?)
काय म्हणाले नेते?
‘राज्यपाल यांना विनंती करण्यासाठी आलो होतो. की त्यांनी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही करून कार्यक्रम जाहीर करावा. पण त्यांना थोडा वेळ हवा आहे. त्यांना अभ्यास करायचा आहे. मला अपेक्षा आहे की ते उद्यापर्यंत या कार्यक्रमाला मान्यता देतील आणि निवडणूक होईल. उमेदवार काही मोठी बाब नाही. आमच्या पक्षात काय एका फोनवर उमेदवार ठरेल, अशी माहिती थोरात यांनी दिली. तर, विधानसभा अध्र्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमावर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. राज्यपालांना निवडणूक कार्यक्रमाच्या पद्धतीवर, बदललेल्या नियमाविषयी अभ्यास करायचा आहे. काही तांत्रिक बाबींची माहिती घ्यायची आहे. 12 निलंबित आमदार किंवा विधानपरिषदेचे १२ आमदार यावर चर्चा झाली नाही. नियमात बदल केलेत त्याविषयी राज्यपालांना कादेशीर दृष्ट्या अभ्यास करायचा आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी
काँग्रेसमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या उमेदवारीवरुन अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील ’10 जनपथ’ या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community