शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून लेखी उत्तर सादर करण्यात आल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. येत्या १४ सप्टेंबरपासून सुनावणीला सुरुवात होईल.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अलिकडेच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील सर्व आमदारांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले होते. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या आमदारांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली.
आता दोन्ही बाजूंकडील उत्तर सादर झाल्याने घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी १४ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. ठाकरे गटाने प्रथम उत्तर सादर केल्याने त्यांना आधी संधी दिली जाईल. दररोज एका आमदाराची बाजू ऐकून घेतली जाणार आहे, अशी माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली.
(हेही वाचा – G-20 Summit : पंतप्रधानांनी सांगितले कोणार्क चक्राचे महत्त्व; हस्तांदोलन, विनोद, मिठी आणि पाहुण्यांचे सभास्थळी आनंदाने स्वागत)
सुनावणी कुठे होणार?
विधिमंडळाच्या (मुंबई) मध्यवर्ती सभागृहात शिवसेना आमदार अपत्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. सुनावणीदरम्यान आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागतील. तसेच अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तीवादही करावा लागेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community