नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांकडून तशा हालचाली सुरू असून, त्यामुळे सर्वपक्षीय कामकाज सल्लागार समितीची बैठक तिसऱ्यांदा रद्द करण्यात आल्याचे कळते.
(हेही वाचा – आमदारांचा जीव टांगणीला; मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय नेतृत्त्वाकडून लाल सिग्नल?)
कोरोनापश्चात तब्बल २ वर्षांनी यंदा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून, अंदाजित कार्यक्रम पत्रिकेनुसार १९ डिसेंबरपासून दोन आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परंतु, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य, कर्नाटक सीमाप्रश्न, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रविरोधी विधाने अशा अनेक मुद्द्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, अधिवेशनाच्या कालावधीत आणखी कपात करण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक तीनदा रद्द
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आणि अन्य बाबी ठरवण्यासाठी विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक गेल्या आठवड्यात आयोजित केली होती. मात्र उपमुख्यमंत्री कार्यालयातून ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ती बैठक बुधवारी होणार होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा अचानक ठरल्याने बैठक होऊ शकली नाही. नंतर ५ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जी-२० परिषदेच्या तयारीपूर्वीच्या बैठकीला दिल्लीत गेल्याने सोमवारी नियोजित बैठक रद्द करण्यात आली. तीन वेळेला बैठक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community