Santosh Deshmukh Murder : देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यात जातीयद्वेष पसरवण्याचा प्रयत्न

गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जातीचा रंग देता कामा नये, पण अनेक जण संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याला जातीचा रंग देण्यासाठी पुढे येत आहे. त्यासाठी मोर्चे आणि निदर्शने करून या विषयाला जातीच्या जोखडात बांधण्याचा प्रयत्न करत आहेत.

109

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder) मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिकी कराड याला अटक करण्यात आले आहे. हत्या झाल्यानंतर लगेच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आणि त्यावेळी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर दबाव आणल्याने फरार वाल्मिकी कराड सीआयडीच्या समोर शरण आला. त्याला अटक केल्यानंतर आता त्याची चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास सुरु असेपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होऊ लागली आहे.

मारेकरीही मराठा समाजाचे असते तर… 

देशमुख यांच्या हत्येमागील (Santosh Deshmukh Murder) मारेकऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, यात अजिबात वाद नाही. त्याविषयी कोणतेही दुमत नाही. पण या हत्येनंतर जे जातीय राजकारण सुरु आहे त्यावर प्रकाश टाकला पाहिजे. देशमुख मराठा समाजाचे आहेत आणि जर मारेकरीही मराठा समाजाचे असते तर हा विषय इतका पेटला असता का? हा कळीचा प्रश्न आहे. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जातीचे राजकरण पेटवले जात आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण केला जात आहे. मराठा आरक्षणानंतर लगोलग ओबीसी आरक्षणाच्या विषयाला हवा देण्यात आली. त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निघून गेली. आता महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका होणार आहेत आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अर्थात मराठा विरुद्ध वंजारी असे कार्ड वापरले जाऊ लागले आहे. त्यासाठी संतोष देशमुख हत्याकांडाचा (Santosh Deshmukh Murder) वापर होत आहे, अशी शंका यावी अशा घटना घडताना दिसत आहेत.

गुन्हेगाराला जातीचा रंग देऊ नये 

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीकरण करण्यामागे गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण कारणीभूत आहे, हे तितकेच खरे आहे. एका मागास जातीतील नेता मोठा होतो, ‘माधव’ अर्थात माळी, धनगर आणि वंजारी यांची मोट बांधतो आणि जातीजमातीची गुंडशाही चालवतो, असे अनेक जुने जाणते सांगतात. गोपीनाथ मुंडे यांनी मळलेल्या वाटेवर त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे भरधाव वेगाने निघालेला आहे का, अशी शंका संतोष देशमुख हत्येच्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणावरुन येत आहे.  गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जातीचा रंग देता कामा नये, पण अनेक जण त्याला जातीचा रंग देण्यासाठी पुढे येत आहेत. त्यासाठी मोर्चे आणि निदर्शने करून या विषयाला जातीच्या जोखडात बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे खासदार बजरंग सोनवणे, भाजपाचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे या नेत्यांचा समावेश आहे.

(हेही वाचा जो बायडेन यांच्याकडून George Soros यांना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार; एलन मस्क म्हणाले, हे विडंबन…)

तर दुसरीकडे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात सुरु केला आहे. त्यांची कुंडली काढण्यास सुरुवात केली असताना त्यांनी अचानक आणखी एक आरोप केला आहे. त्यांना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड मानसिक छळ होत आहे. बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत, नरेंद्र सांगळे या व्यक्ती हा फोन करत आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत.

ओबीसीतील वंजारी समाजाला लक्ष्य करणे चुकीचे 

आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते आमदार सुरेश धस यांच्या विरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगेंना बेड्या ठोका, धसांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली आहे. हत्येविरोधात (Santosh Deshmukh Murder) राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्चादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपा नेते आमदार सुरेश धस यांनी ओबीसीतील वंजारी समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी केला आहे. ओबीसी समाजाचा घटक असलेल्या वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवण्यात येत आहे. ज्या पद्धतीने एखाद्या समाजाविरोधात चितावणीखोर भाषा करण्यात येत आहे. त्यांच्या घरात घुसण्याची भाषा करण्यात येत आहे. त्या विरोधात राज्याच्या गृहखात्याने तत्काळ पावले उचलावीत, असे ससाणे म्हणाले आहेत. त्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांना तपासासाठी मोकळीक द्या!

एखाद्या हत्येचा तपास पोलीस यंत्रणा त्यांच्या परीने करत असते, तपासाची पद्धत ठरलेली असते. हत्येमागील सर्व शक्यता पडताळल्या जातात. त्यामुळे देशमुख हत्येप्रकरणात (Santosh Deshmukh Murder) पोलिसांच्या तपासात कुणीही हस्तक्षेप न करता पोलिसांना तपासासाठी मोकळीक देणे हेच योग्य आहे. मात्र या प्रकरणात तसे होताना दिसत नाही, हे दुर्दैव!

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.