“बेस्ट कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी(उपदान) कधी देणार?- अतुल भातखळकर

सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ग्रॅच्युटी पासून दूर ठेवण्याचा बेस्ट प्रशासन व ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला बेस्ट उपक्रम मागील अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे. पण तरीसुद्धा विकासकांकडे असलेली सुमारे १६० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करायची नाही आणि दुसरीकडे बेस्टकडे पैसे नसल्याचे कारण पुढे करत, ३ हजार ५०० बेस्ट कर्मचाऱ्यांची सुमारे ४५० कोटी रुपयांची ग्रॅच्युटी मागील अनेक महिन्यांपासून द्यायची नाही अशी दुटप्पी भूमिका ठाकरे सरकारकडून घेतली जात आहे. हे अन्यायकारक व बेकायदेशीर असून या सर्व कर्मचाऱ्यांची थकीत ग्रॅच्युटी कधी देणार, असा प्रश्न भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला.

१६० कोटी रुपयांची थकबाकी

कायद्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी वेळेत अदा करणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा बेस्ट प्रशासनाने मागील तीन महिन्यांपासून ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी अद्याप दिली नाही. बेस्टच्या हक्काची १६० कोटी रुपयांची थकबाकी कनाकिया स्पेसेस, कनाकिया किंग स्टाईल प्रा.लि., घैसास इस्टेट, विजय असोसिएस्ट्स, विनिता इस्टेट आणि केएसएल इंडस्ट्रीज लि. या सहा विकासकांनी अद्याप दिलेली नाही.

(हेही वाचाः सुधीर भाऊ एकनाथ शिंदेंना म्हणाले तुम्ही तर सीएम…)

विकासकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न

यात धक्कादायक बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या लेखा परीक्षकांनी ही रक्कम १६० कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगून सुद्धा ती नाकारण्याचे काम बेस्ट प्रशासनाने केले. हे अत्यंत निंदनीय असून या सहा विकासकांना पाठीशी घालण्याचे काम बेस्ट प्रशासनाकडून केले जात असल्याची टीका करतानाच, या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे. यावेळी विचारण्यात आलेल्या एकही प्रश्नाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट व समाधानकारक उत्तर दिले नसल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ग्रॅच्युटी पासून दूर ठेवण्याचा बेस्ट प्रशासन व ठाकरे सरकारचा डाव असल्याचा आरोप सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

(हेही वाचाः स्वा. सावरकरांसाठी साधं एक ट्वीटही नाही, संभाजीनगरचाही पडला मुख्यमंत्र्यांना विसर- फडणवीस!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here