राज्याचे गृहखाते झोपा काढतेय का? ड्रग्स प्रकरणी भाजपाचा हल्लाबोल 

158

मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले, पण, मुंबईत अशा प्रकारे सर्रास अंमली पदार्थांची तस्करी आणि वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री काय करत होते, ते काय झोप काढत होते का?, अशा शब्दांत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर सडकून टिका केली.

काय म्हणाले अतुल भातखळकर? 

एनसीबी स्वतःच्या माहितीच्या आधारे मुंबईच्या क्रूझवर छापे टाकते, ड्रग्स माफियांना पकडते, ड्रग्स घेणाऱ्यांना पकडते, मग राज्याचे गृहखाते आणि अमली पदार्थ विरोध पथक झोपा काढते? मग राज्याचेही अमली पदार्थ विरोधी पथक हे सहा महिने काय काम करत होते? त्यांनी आतापर्यंत किती छापे टाकले? दिल्लीचे पोलिस मुंबईतील दहशतवाद्यांना पकडते, याला कारण म्हणजे गृहखाते झोपले आहे आणि राजकीय मतपेटीवर लक्ष ठेवून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा, असा जणू आदेशच या महाभकास आघाडीकडून मिळाले आहेत. म्हणूनच आर्यन खानच्या समर्थनार्थ जयराम रमेश असो किंवा काँग्रेसचे इतर प्रवक्ते पुढे येत आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राची कायदा व सुरक्षा लयास गेली आहे, ही यंत्रणा खंडणी वसूल करत आहे, अशी टीका आमदार भातखळकर यांनी केली.

(हेही वाचा : अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवले, तर केंद्र सरकार देणार पैसे! अशी आहे योजना)

राज्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

मागील दोन दिवसांपासून मुंबईतील समुद्रातील क्रूझवर एनसीबीने छापेमारी करून हाय प्रोफाइल काही लोकांना अटक केली आहे. त्यामध्ये किंग खानचा मुलगा आर्यन खान याचा समावेश आहे. त्यामुळे ही कारवाई आता बरीच चर्चेत आली आहे. तसेच या कारवाईत अनेक जण हाय प्रोफाइल लोक अडकले आहेत. त्यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे. अशा वेळी राजकीय पातळीवर आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. राज्य सरकारच्या बाजूने मात्र काहीच प्रतिक्रिया येत नाही. या कारवाईमुळे राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर टीका होऊ लागली आहे. त्यामध्ये भाजपाने यात बाह्या मागे सरसावल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.