परप्रांतीयांची नोंद : भाजपाची मुख्यमंत्र्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करून त्यांच्यात भीती पसरवणारे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात समता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

साकीनाका बलात्कार आणि खून या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह खात्यातील उच्च पदस्थांची बैठक घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी अन्य राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करावी, ते कुठून येतात आणि कुठे जातात याची माहिती घ्या असा आदेश पोलिसांना दिला. हे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासारखे आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोध भाजपाचे नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली येथील समता नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले अतुल भातखळकर?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करून त्यांच्यात भीती पसरवणारे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात समता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय राठोड, धनंजय मुंडे, धनंजय गावडे यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप आहेत. त्यांना का संरक्षण दिले? मुख्यमंत्री स्वतःचे अपयश लपवण्यासाठी प्रांतवादाचा आधार घेत आहेत. त्यांचे हे कृत्य घटनाविरोधी आहे. पोलिसांनी जर ४ दिवसांत गुन्हा दाखल केला नाही, तर आपण न्यायालयात जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या वक्तव्याला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची किनार आहे. मुख्यमंत्री थोबाडीत मारीन म्हणतात, मारहाण करणाऱ्यांचा सत्कार करतात, त्यांना कायद्याची चाड उरली नाही. हे राज्य कायद्याचे आहे, याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला आहे, त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असेही आमदार भातखळकर म्हणाले.

अतुल भातखळकर यांचे डोके फिरले आहे. त्याचे डोके ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आली, तिची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात मुख्यमंत्री काय चुकीचे बोलले? बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली. केंद्राच्याही अशा सूचना आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहे. भाजपवाले नैराश्यातून आरोप करत आहे.
– मनिषा कायंदे, प्रवक्त्या, शिवसेना.

(हेही वाचा : मोडकळीस येताच शरद पवारांनी काँग्रेसची माडी सोडली! रावसाहेब दानवेंचा घणाघात)

तर हा देश सर्वांचा आहे, नोंद ठेवणे चुकीचे नाही, पण परप्रांतीय आणि स्थानिक असा भेदभाव करणे चुकीचे आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. तर परप्रांतीयच असे गुन्हे करतात का? एखाद्या समाजाला लक्ष्य करणे चुकीचे आहे. तसेच जर गुन्ह्यांचा अभ्यास करायचा झाला, तर वेगळेच सत्य बाहेर पडेल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here