शिंदे गट आणि भाजपा सरकारमधील बहुचर्चित, बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील ३ ऑगस्ट रोजी शिंदे गट आणि भाजपामधील मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम होणार आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे यासंबंधी संकेत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
शिंदे गटाला १५ मंत्रीपदे मिळणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाच शपथविधी होऊन १ महिना उलटला, तरी या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, यावरून जोरदार चर्चा सुरु आहे. कारण तब्बल महिनाभर केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेच राज्याचा कारभार हाकत आहेत, त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उगारण्यात येत आहे. त्यामुळे अखेर या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार निश्चित झाला आहे. याकरता ३ ऑगस्ट हा दिवस ठरला असून राजभवनात या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाला २४ ते २५ मंत्रिपदे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला १५ ते १६ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली.
(हेही वाचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, शिंदे गटाला किती मिळणार मंत्रीपदे?)
अपक्षांना मंत्रिपदे मिळणार?
एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना देखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ८ ते ९ अपक्ष आमदार आहेत. तर, भाजपासोबत देखील ५ ते ६ अपक्ष आमदार आहेत. उद्वव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या ९ मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. या नेत्यांना शिंदे गटातून पुन्हा संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community