औरंगाबाद येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरुन एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध करणा-यांचा निषेध करतो, अशा शब्दांत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणारच, अशी भूमिका सत्तार यांनी मांडली आहे.
काय म्हणाले सत्तार?
इम्तियाज जलीलसारख्या शिकलेल्या, लोकसभेत सांसद असलेल्या माणसाने महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध करणं ही दुर्देैवी बाब आहे. मी त्याचा निषेध करतो. महाराणा प्रतापांसारखे शूर वीर, एक योद्धा आणि त्याकाळातील राजे यांना विरोध करणं, ही खर तर दुर्दैवी बाब आहे. भविष्यामध्ये महाराणा प्रतापांचा पुतळा ज्या ठिकाणी बसवला जाईल त्या ठिकाणी सर्वात पुढे आम्ही असू, असं सत्तार यांनी स्पष्ट केलं.
( हेही वाचा :नितेश राणेंच्या अडचणीत वाढ! जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचाही नकार )
असा आहे पुतळ्याचा वाद
शहरातील कॅनॉट परिसरात एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याची योजना आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करण्याचा भाजप आणि शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र मागील आठवड्यात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना एक पत्र लिहून हा पुतळा उभारण्यासाठी विरोध दर्शवला. पुतळा उभारण्याऐवजी ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा उभारावी, हाच शूर योद्धा महाराणा प्रताप यांच्या प्रती आदर भाव असेल, अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. त्यानंतर राजपुत समाजाच्यावतीने शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या नेत्यांनीही याला विरोध दर्शवला आहे.
Join Our WhatsApp Community