नामांतराच्या मुद्द्यावरून राऊतांकडून अपप्रचार?

110

औरंगाबाद, उस्मानाबादसह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराला शिंदे सरकारने गुरुवारी स्थगिती दिली. त्यांनतर या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर टीकेचे सत्र सुरू केले आहे. हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी एकीकडे या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यामागील कारणे स्पष्ट केली असताना, राऊतांकडून नामांतराच्या मुद्द्यावरून अपप्रचार केला जातोय का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर, सरकारला असे निर्णय घेता येत नाहीत. तरीही सरकारने नामांतराचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हे निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नसल्याने, आम्हाला ते निर्णय परत घ्यावे लागणार आहेत. आम्ही ते घेणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

( हेही वाचा: “देशात २९ नाही ७५ राज्यांची गरज”, सुरुवात विदर्भापासून करा; महाराष्ट्रातील माजी आमदाराचे पंतप्रधानांना पत्र )

काय म्हणाले संजय राऊत?

औरंगाबाद – उस्मानाबाद नामांतर निर्णयाला स्थगिती देण्याच्या वृत्तावर संजय राऊत म्हणाले, मविआने दिलेल्या 5 निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली. ठाकरे सरकारने औरंगाबाद- संभाजीनगर, उस्मानाबाद- धाराशीव केले. मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील हे नावही दिले. पण या सरकारने निर्णय फिरवले. त्यामुळे हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे. संभाजीनगर कधी करणार हा प्रश्न भाजप अनेक वर्षांपासून विचारत होते. दि.बा. पाटील यांच्या नावासाठीही मोर्चे काढत होते. उद्धव ठाकरे यांनी कोणाचीही पर्वा न करता हे निर्णय घेतले. या निर्णयांना सरकारने स्थगिती दिली असेल, तर असे ढोंगी इतर कुणी नाहीत. हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्यामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.