औरंगाबादच्या सभेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत आल्याचे दिसतेय. या सभेसाठी पोलिसांनी राज ठाकरेंना काही नियम व अटी घालून दिल्या होत्या. या अटींचे पालन न केल्यास पोलीस राज ठाकरेंवर कारवाई करणार असा इशारादेखील देण्यात आला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मनसेच्या अनेक नेत्यांना नोटीसा पाठवण्यास पोलिसांनी सुरूवात केली असताना औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय. याआधी ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर भडकावू भाषण, वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरेंवर कलम ११६, ११७, मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ आणि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – “शेवटचा १ दिवस बाकी, भोंगे बंद झालेच पाहिजे”, मनसेने दिले रिमाइंडर)
१६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन
मिशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या विरुद्ध औरंगाबाद येथील चिथावणीखोर भाषणासंदर्भात आजच औरंगाबाद येथे गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी वर्तवली होती. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यापूर्वीच औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. ही सभा होण्यापूर्वी पोलिसांनी तब्बल १६ अटी घातल्या होत्या त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना अढळून आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या अटी किंवा नियमांचे पालन झाले नाही तर कारवाई करू, असा इशारा देखील देण्यात आला होता.
राज ठाकरेंसह आयोजकांविरोधात गुन्हा दाखल
औरंगाबादमध्ये झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणानंतर सोमवारी पोलिसांकडून भाषणांबाबात सर्व डेटा जमा कऱण्यात आला होता. तसेच यावेळी कोणत्या नियम अटींचे पालन राज ठाकरेंकडून करण्यात आले, याविषयी अहवाल तयार करण्यात आला. यानंतर हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात येणार होता. हा अहवाल पाठवल्यानंतर पोलीस आयुक्तांतर्फे राज ठाकरेंसह आयोजकांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात येईल, अशी माहिती देखील देण्यात आली होती. आणि अखेर आज ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community