मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरचे अजानचे भोंगे काढले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, अशा आशयाचे वक्तव्य केले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. मशिदींवरचे हे भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. दरम्यान, १ मे रोजी आयोजित केलेल्या औरंगाबादेतील मनसेच्या सभेवरून चांगलाच वाद सुरू आहे. अशातच राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी देऊ नये असे म्हणत राजकीय संघटनांनी तीव्र विरोध केला. तसेच सभा घेऊ नये यासाठी येणाऱ्या निवेदनांची संख्या वाढत असतानाच मनसे मात्र ही सभा घेण्यावर ठाम आहेत.
( औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला ‘या’ राजकीय संघटनांचा तीव्र विरोध)
येत्या १ मे रोजी मनसेची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानात घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र औरंगाबाद पोलिसांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची सभा गरवारे स्टेडियमवर घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र मनसे ठरलेल्या ठिकाणीच सभा घेण्यास ठाम आहे. तसेच मनसेकडून या सभेला उपस्थित राहण्यासाठी सोशल मीडियावर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. तर मनसे पदाधिकारी या सभेसाठी सज्ज असून त्यांची तयारी सुरू आहे.
१ तारखेच्या सभेला परवानगी मिळणार की नाही?
वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला तीव्र विरोध केल्याची माहिती मिळतेय. राज ठाकरे यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असे पत्र पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घोषणा केलेल्या १ तारखेच्या सभेला परवानगी मिळते का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
या संघटनांचा राज ठाकरेंच्या सभेला विरोध?
1. वंचित बहुजन आघाडी .
2. प्रहार जनशक्ती संघटना
3. मौलांना आझाद विचार मंच
4. गब्बर ॲक्शन संघटना
5.ऑल इंडिया पँथर सेना
6. मुस्लिम नुमाइंदा काँऊन्सिल