एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेतील बंडाला आता बरेच दिवस झाले, यानंतरही बंडखोर आमदारांची ठाकरेंबाबतची भूमिकाही बदलताना दिसतेय. दरम्यान, औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. त्याजागी आता नवी सेना नवा सेनापती असल्याचे चित्र बघायला मिळत असून त्यांनी आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावल्याचे दिसतेय.
(हेही वाचा – राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशावर ‘शिंदेंचं नाव’, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…)
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आपल्या कार्यालयातून हटवल्यानंतर स्पष्टीकरण देताना शिरसाट म्हणाले, आदित्य ठाकरे यांचा फोटो माझ्या कार्यालयात नव्हता. उद्धव ठाकरेंचा फोटो जरूर होता. माझ्या कार्यालयात नेहमी एकच फोटो असतो. तुम्ही कार्यालयात पाहिलं तर तुम्हाला माझाही फोटो कुठे दिसणार नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात असणं अत्यावश्यक आहे.
यापुढे शिरसाट असेही म्हणाले की, राहिला प्रश्न शिवसेना प्रमुखांच्या फोटोचा, तर ते आमच्या हृदयस्थानी आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताच तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा फोटो दिसेल आणि तो आयुष्यात कधीही तेथून हलणार नाही. कारण त्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला मोठं केलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळेच आम्ही मोठे आहोत.
उद्धव ठाकरेंचा फोटो हटवून तिघे आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आनंद दिघे यांना आम्ही मानतो. जे लोक आम्हाला गद्दार, बंडखोर म्हणून रोजच आमची टेहाळणी करत असतील तर, आम्ही त्यांच्या फोटोकडे पाहून काय समजायचं? अरे हे… आम्हाला गद्दार म्हणतात, हे आम्हाला बंडखोर म्हणतात, हे आम्हाला विकलेले म्हणतात, असं सगळं पाहून आम्ही त्यांना अपेक्षित धरायचं का? ज्यादिवशी ते चांगलं बोलायला लागतील, तेव्हा त्यांच्याही फोटो कार्यालयात लावण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.