औरंगजेबाचे गुणगान गाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थकत नाहीत. औरंगजेब हा कोणी शांतिदूत नव्हता. मानवतेचा पुजारी नव्हता. त्याच्यासारखा क्रूर, उलट्या काळजाचा नराधम त्या काळात अन्य कोणी नव्हता. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तरीसुद्धा औरंगजेबाची स्तुती सुमने गाणाऱ्यांना शब्दकोशातले शब्द कमी पडतात.
वास्तविक आज देशांमध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारला विरोध करण्याच्या नादात राष्ट्रहिताला विरोध केला जात आहे. औरंगजेब हा या देशाचा शत्रू होता. पाकिस्तान ही याच देशाचा शत्रू आहे. पाकिस्तानचे काळे कारनामे चव्हाट्यावर आणण्याचे काम देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर करत आहेत. जगातला दहशतवाद नष्ट करण्याचे ध्येय हिंदुस्थानने जगासमोर ठेवले आहे. पाकिस्तान हा आतंकवाद्यांचे केंद्र म्हणूनच जगात ओळखले जातो. पाकिस्तानमुळेच आपल्या देशामध्ये दहशतवाद वाढतो आहे. या दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आतंकवाद्यांच्या श्रद्धास्थानांचा गौरव करणे म्हणजे आपणच आपल्या देशाच्या विरोधात जाणे होय. औरंगजेब आतंकवाद्यांचा नायक असू शकतो पण या देशातल्या नागरिकांचा नाही. एखाद्या राजकीय पक्षाचे नेते आतंकवाद्यांच्या नायकांवर स्तुती सुमने उधळतात त्यावेळी या आतंकवाद्यांच्या विरोधात चालू असलेल्या लढ्याला ते खीळ घालतात. हीच गोष्ट राष्ट्रहिताला अत्यंत बाधक आहे. म्हणूनच त्याला विरोध करणे नितांत आवश्यक आहे.
(हेही वाचा राहुल गांधी यांच्या ‘टी शर्ट’ ची पोलखोल; भाजपच्या नेत्यांचे ट्विट व्हायरल)
मुसलमान या देशांमध्ये अल्पसंख्य असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. तरच मुसलमानांना हिंदूंच्या वर्चस्वाची भीती वाटणार नाही. अशा प्रकारचा तथ्यहीन विचार, राष्ट्रघातक विचार आपल्या देशात यशस्वीपणे रुजवण्यात आला. या विचाराला अनुसरून इस्लामिक क्रूरकर्म्यांचा उदो उदो करण्याचा प्रकार सुरू झाला. नैतिकतेचा विचार केला तर अल्पसंख्यांकांना संतुष्ट करण्यासाठी बहुसंख्यांक असलेल्या समाजाने स्वतःवर त्या अल्पसंख्याला मात करता यावी म्हणून सर्व प्रकारच्या सवलती आणि विशेष अधिकार द्यावेत असे म्हणणे हा अन्यायाचा कळस आहे. अल्पसंख्याकांच्या अशा अवाजवी मागण्यांचा किंवा अशा कोणत्याही घटनात्मक उपायाचा राष्ट्रसंघाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. ही गोष्ट आपण विस्मृतीत जाऊ द्यायची नाही. असे सावरकर म्हणाले होते. ज्या देशात मुसलमान बहुसंख्य आहेत त्या देशात मुसलमान अल्पसंख्याकांना कोणत्या प्रकारच्या सवलती देतात? तो अल्पसंख्याक समाज जीव मुठीत धरून इस्लामिक राष्ट्रात राहतो किंवा परागंदा होतो. त्याच्यावर सातत्याने अन्याय होत असतो. मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यांच्या हातात सत्ता गेली की अल्पसंख्यांकांना सुखाने श्वास घेता येत नाही. त्याबाबतीत अल्पसंख्य समाजाची कड घेणारे मौन बाळगतात.
(हेही वाचा कारगिल युद्धाच्या विजयगाथा सांगताना परमवीरचक्र सन्मानित योगेंद्र सिंह यादव यांनी सांगितले थरारक अनुभव)
सावरकरांच्या भाषेत सांगायचे तर… अल्पसंख्य मुसलमानांना जर हिंदूंच्या वर्चस्वाची भीती वाटत असेल तर त्यांनी हिंदूंसोबत सख्ख्य जोडले पाहिजे. या देशाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. घटनेच्या आणि निर्बंधांच्या मर्यादेत राहून त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवन जगले पाहिजे. वैयक्तिक जीवनात त्यांनी आपल्या धर्मग्रंथांचे अवश्य वाचन करावे. सार्वजनिक आणि राष्ट्रीय जीवनात मात्र त्यांनी घटनेला आणि न्यायव्यवस्थेला सर्वोच्च मानले पाहिजे. हिंदू स्वतः कोणत्याही घटनेत सर्वांना समान नागरीकत्वाचे मूलभूत अधिकार, धार्मिक अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक आणि निर्बंधात्मक समानता यांचा समावेश करण्यास सिद्ध आहेत. हिंदू स्वतःच्या अस्तित्वाला बाधा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणार नाहीत किंवा अशा कोणत्याही अटी पाळणार नाहीत. हिंदूंना स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्या अधिकारावर कोणालाही आघात करता येणार नाही. अशी भूमिका हिंदूंनी घेतली की मुसलमानांची बाजू घेणाऱ्या राजकीय नेत्यांना हिंदूंची ही बाजू पटत नाही. मग औरंगजेबाविषयी त्यांच्या डोळ्यात आसू येतात आणि हिंदूंसाठी ते आसूडाचा उपयोग करतात. हीच गोष्ट राष्ट्रहिताला बाधक आहे. म्हणूनच अशा गोष्टींना विरोध करणे हे राष्ट्रीय कर्तव्य ठरते.
लेखक- दुर्गेश परुळकर, व्याख्याते
Join Our WhatsApp Community