मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम जनतेला राबवण्याची विनंती केली आहे. देशभक्त जनतेने आपला डीपी म्हणून तिरंगा ठेवलेला आहे. आता नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार लोक आपल्या घरावर तिरंगा फडकवणार आहेत. प्रत्येक घरावर तिरंगा पाहताना, ते दृश्य किती मनोहर दिसेल? देशभक्तीचा हा अद्भूत नजारा पाहायला मिळणार आहे.
विरोध करणारे विघ्नसंतोषी
आता देशात काहीतरी चांगलं होऊ लागलं तर काही विघ्नसंतोषी लोकांच्या पोटात दुखू लागतं. त्यांना या चांगल्या मोहिमेत देखील वाईट दिसू लागलं आहे. अमोल मिटकरींपासून अनेकांनी खुसपटं काढायला सुरुवात केलेली आहे. त्यांना हर घर तिरंगा ही मोहीम फालतू वाटत आहे. मूह मे राम, बगल मे छुरी वाटत आहे. लोकांकडे तिरंगा फडकवण्यासाठी घर नाही, अशी बोचरी टीका ते करत आहेत. जे तिरंगा फडकवणार नाही ते देशद्रोही आहेत का? असा वाह्यात प्रश्नही विचारत आहेत. हे त्याच संस्कृतीचे लोक आहेत, ज्यांची सत्ता या देशावर ५० पेक्षा अधिक वर्षे होती. या लोकांना गावागावात वीज पोहोचवता आली नाही, गॅस कनेक्शन देता आले नाही. आज लोकांकडे घर नाही, असं म्हणताना ‘आपण इतकी वर्षे काय केले’, असा प्रश्न या निर्लज्जांना पडत नाही.
टीका करणार्यांना हे का सूचले नाही?
आज जनता खुश आहे. अनेक सोसायटीमध्ये लोक स्वतःहून पुढे येत आहेत आणि हर घर तिरंगा ही मोहीम उत्साहात राबवत आहेत. हे काम टीका करणार्यांना करायला हवं होतं. इतकी वर्षे सत्ता उपभोगताना आणि भ्रष्टाचार करताना कदाचित अशा उपक्रमांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसावा. म्हणून इतरांनी चांगलं काम केलं, तर त्यास नावे ठेवलीच पाहिजे असा नियम आहे का? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कॉंग्रेस पक्षाला करण्यासारखी अनेक लहान-मोठी लोकोपयोगी कामे होती. हर घर तिरंगा यासारखी मोहीम राबवता आली असती, जेणेकरुन लोकांना या स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी करुन घेता आलं असतं. कॉंग्रेसचे नेते लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करुन लोकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करुन घेतलं होतं. त्यांचा आदर्श ठेवून लोकांना देशाच्या अनेक उपक्रमात सहभागी करुन घेता आलं असतं. परंतु ७० वर्षांत जे कॉंग्रेसला जमलं नाही ते नरेंद्र मोदींनी करुन दाखवल्यामुळे कॉंग्रेसजन दुखावले गेले आहेत.
आनंदावर विर्जण घालू नका
दुसरी गोष्ट हर घर तिरंगा ही मोहीम आहे. पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे, आव्हान दिलेलं नाही, जळजबरी केलेली नाही. त्यामुळे ज्यांना तिरंगा फडकवायचा नसेल तर तो त्यांना वैयक्तिक प्रश्न आहे. लोक उत्सव साजरा करत असताना, तुम्हाला तुमच्या घरात बसून रडायचं असेल, तर लोकांना त्याच्याशी काही देणंघेणं नाही. त्यामुळे नको ते वाह्यात प्रश्न उपस्थित करुन जनतेच्या आनंदावर विर्जण घालण्याचं काम करु नये. तुम्ही बसा रडत आम्ही ही मोहीम यशस्वीपणे राबवणार आहोत.
हर घर तिरंगा
जय हिंद…