स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सध्याच्या पिढीसाठी ‘संस्कारांचा उत्सव’- पंतप्रधान

117

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा”शी संबंधित राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा युवकांसाठी संस्कारांचा उत्सव आहे आणि हा उत्सव या युवकांमध्ये देशासाठी योगदान देण्याची अमर्याद उत्कटता भरून टाकेल. सध्याची पिढी हे उद्याचे नेते आहेत आणि म्हणून स्वप्ने साकार करण्यासाठी तसेच भारत @100 ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला आता त्यांच्यामध्ये कर्तव्य आणि जबाबदारीची भावना रुजविणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – राऊत जेलमधून ‘रोखठोक’ लिहिताय की त्यांच्या नावावर दुसरंच कोणी लिहितंय?; मनसेचा सवाल)

पंतप्रधान पुढे असे म्हणाले की, तंत्रज्ञानविषयक क्रांतीने बदल घडून येण्याचा वेग आश्चर्यकारकरित्या वाढविला आहे. आधी जे पिढ्यापिढ्यांच्या अंतराने घडत असे ते आता काही दशकांमध्ये घडणे शक्य झाले आहे.आपल्या देशाची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण आता जुन्या तंत्रांवर अवलंबून राहू शकत नाही. म्हणूनच आगामी काळात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या युवकांची क्षमता बांधणी करणे आणि त्यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील राष्ट्रभक्तीचा उत्साह अभूतपूर्व

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान दिल्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला हे यश मिळाले आहे. या महोत्सवासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील समित्यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी अहोरात्र काम केले असे त्यांनी नमूद केले. पुढे पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला असलेली भावनिक छटा हा या अभियानाचा केंद्रबिंदू आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात दिसलेला राष्ट्रभक्तीचा उत्साह अभूतपूर्व आहे. हाच उत्साह आपल्याला आपल्या सध्याच्या पिढीमध्ये रुजविणे आणि त्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी करणे आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले. ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशात राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारलेले वातावरण निर्माण करत असून राष्ट्र उभारणीशी आपल्या युवकांचे भावनिक बंध निर्माण करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे.

एकसंध राष्ट्र हेच प्रगतीशील राष्ट्र

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, आपण आपल्या एकतेची जोपासना आणि संवर्धन केले पाहिजे जेणेकरून “एक भारत श्रेष्ठ भारत” म्हणून भारत नावारुपास येईल. कारण एकसंध राष्ट्र हेच प्रगतीशील राष्ट्र राहू शकते. या प्रकाशात, आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा एकतेचे प्रतीक आहे.अशी एकता जी देशासाठी सकारात्मकता आणि समृद्धी आणते, असे ही ते म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही “संकल्प से सिद्धी” या भावनेने प्रेरित अमृत कालच्या कालखंडातून जात आहोत.हाच कालखंड येत्या 25 वर्षांत आपल्या देशाला यशाच्या शिखरावर नेईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अधिक यशस्वी करण्यासाठी त्यांनी समितीच्या सर्व सदस्यांना आपल्या सूचना पाठवण्याची विनंती केली.

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला सुरुवात झाल्यापासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेणारे सादरीकरण केले. या राष्ट्रीय समितीची पहिली बैठक 8 मार्च 2021 रोजी झाली होती, त्यानंतर 12 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात केली. या समितीची दुसरी बैठक 22 डिसेंबर 2021 रोजी झाली. लोकसभेचे सभापती, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी, आध्यात्मिक नेते, कलाकार आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींसह राष्ट्रीय समितीमधील विविध सदस्य या बैठकीला हजर होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.