अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलत असताना आसाममध्ये लोकं कुत्रे खातात असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेत उमटले. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार गोंधळ घातला आणि बच्चू कडूंच्या अटकेचीही मागणी केली. त्यानंतर आता बच्चू कडूंनी माफी मागत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
अधिवेशनात काय म्हणाले होते बच्चू कडू?
३ मार्चला विधानसभेत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावेळी बच्चू कडू यांनी भटके कुत्रे आसामला पाठवण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला होता. बच्चू कडू म्हणाले होते की, ‘मंत्री महोदय, याची समिती करण्यापेक्षा तुम्ही थेट अॅक्शन प्लॅन जाहीर करा. जेवढे रस्त्यावर कुत्रे आहेत, तेवढे उचला आणि आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये या कुत्र्याला किंमत आहे अध्यक्ष महोदय. किमान कुत्रा आठ-नऊ हजाराला विकतो. नाहीतर माहिती घ्या माझ्याकडे आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला जाऊन आलो, तिथे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, जसे इथे बोकड खातात, तसे तिथे कुत्रे खातात. म्हणून अध्यक्ष महोदय, तिथल्या व्यापाऱ्यांना बोलावून तुम्ही जर याच्यावर उपायोजना केली, तर अध्यक्ष महोदय एका दिवसांत तोडगा निघतो. तुम्ही तिथल्या सरकारसोबत बोलना. मग ते घेऊन जातील सगळे, त्यांचा व्यापार होईल अध्यक्ष महोदय. एकदाचा संपवून टाका विषय.’
कडूंचा माफीनाफा
रविवारी प्रसार माध्यमांसोबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘नागालँडमधले लोकं कुत्रे खातात. मला वाटले आसाममध्ये. दोन्ही राज्य जवळपास आहेत ना. त्यामुळे चुकून आसाम निघाले, नागालँड निघायला पाहिजे होते. एवढीच त्याच्यातली चूक आहे. आता त्या राज्यातल्या लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो.’
(हेही वाचा – मंत्रीपदाचा सट्टा लावून शिंदेंबरोबर.., गुलाबरावांच्या या विधानावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…)
Join Our WhatsApp Community