शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार झाला, यावेळी शिंदे गटातील ९ जणांना कॅबिनेट पद देण्यात आले आहे. विस्तारानंतर शपथ घेतलेल्या शिंदे गटातील सर्व मंत्र्यांचे काम सुरू होण्यापूर्वी शिवेसना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना सर्वांनी अभिवादन केले. यावेळी नव्या मंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमदार बच्चू कडू नाराज असल्याच्या प्रश्नावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही भाष्य केले, तसेच खाते वाटप कधी होणार याबाबत ते बोलले.
काय म्हणाले केसरकर
मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसांपूर्वी करण्यात आला असून गुरूवारी संध्याकाळपर्यंत खाते वाटप होऊ शकते, असे केसरकरांनी सांगितले. जी-जी खाती आम्हाला दिली जातील त्याचा पदभार आम्ही स्वीकारू असे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – DGCA Rule: आता ‘या’ प्रवाशांना विमानाने प्रवास करता येणार नाही! काय आहे डीजीसीएचे आदेश?)
माध्यमांनी बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत केसरकरांनी विचारणा केली असता ते म्हणाले, सर्वांना योग्य तो सन्मान दिला जाईल. आमच्या मित्र पक्षांची आम्ही योग्य ती काळजी घेऊ. येत्या थोड्याच दिवसात बच्चू कडूंच्या लक्षात येईल. ते आमचे जवळचे नेते आहेत. आमच्या मित्र पक्षांचे ते अध्यक्ष आहे. त्यांचा योग्य तो मान महाराष्ट्रात दिला जाईल. बच्चू कडू यांना भेटण्यासाठी आम्ही जाणार आहोत. यासह त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांना चांगलं खातं मिळाल्याचे दिसेल, असेही संकेत त्यांनी यावेळी दिलेत.
केसरकर पुढे असेही म्हणाले की, बाळासाहेबांचे महाराष्ट्रासाठी असणारे विचार, त्यांच्या योजना या प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आणि आमचे सहयोगी भाजप आणि त्याचे नेते देवेंद्र फडणवीस हे सर्व कटीबद्ध आहोत. त्यामुळे ख-या अर्थाने बाळासाहेबांचा विचार घेऊन महाराष्ट्राचा विकास करण्याच्यादृष्टीने आम्ही आज सर्वजण बाळासाहेबांना नमन करण्यासाठी आलो आहोत. तसेच त्यांचे आशिर्वाद घेऊनच आम्ही कामकाजाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.