बडा कब्रस्तानला पोलीस छावणीचे स्वरूप, कब्रस्तानचा भ्रष्ट कारभार उघड करणारे आले पुढे

193

मुंबईतील ‘बडा कब्रस्तान’मध्ये दफन करण्यात आलेल्या १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा मुद्दा चांगलाच जोर धरू लागला असून बडा कब्रस्तान भोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य केलेले नसले तरी हा मुद्दा आमचा नसल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर म्हटले आहे.

याकूब मेमनची कबर सजवली

१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याला २०१५ मध्ये फाशीची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिल्यानंतर त्याची दफनविधी मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये करण्यात आली होती. ७ वर्षांनी याकूब मेमन याच्या कबरीचा वादग्रस्त मुद्दा एका वृत्तवाहिनीने समोर आणला, एका अतिरेक्यांची कबर सजवली जात असून त्याच्या कबरी भोवती संगमरवरी दगड लावून त्याला रोषणाई करण्यात आली असल्याचे वृत्त प्रसारित झाले.

(हेही वाचा 1993च्या स्फोटातील मृताची कबर खोदली, पण गुन्हेगार याकूबच्या कबरीला दिले संरक्षण)

प्रसारमाध्यमांना आडकाठी

मुंबई बॉम्बस्फोटात दोषी असलेल्या आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा वादग्रस्त मुद्दा इतर प्रसारमाध्यमांनी उचलून धरतात दुसऱ्या दिवशी अनेकानी बडा कब्रस्तानकडे धाव घेण्यास सुरुवात केली होती. प्रकरण चांगलेच तापत असल्याचे समजताच पोलिसांनी बडा कब्रस्तान येथे धाव घेऊन सर्वात प्रथम याकूबच्या कबरी जवळ लावण्यात आलेली विद्युत रोषणाई काढली, त्यानंतर संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, कब्रस्तानचे मुख्य गेट तसेच इतर गेट बंद करण्यात आले होते.
प्रत्येक गेटवर पोलीस आणि कब्रस्तानची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, कब्रस्तानच्या आत जाण्यास मज्जाव केला जात होता, बडा कब्रस्तानच्या व्यवस्थेवर पूर्वीपासून नाराज असणाऱ्यांनी देखील कब्रस्तान भोवती गर्दी करून प्रसार माध्यमांसमोर बडा कब्रस्तानच्या गलथान कारभार, भ्रष्टाचार समोर आणत होते. येथील परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांकडून लोकांना तेथून जाण्यासाठी व गर्दी करण्यासाठी सांगण्यात येत होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पोलिसांकडून तेथून जाण्यासाठी सांगितले जात होते. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फेऱ्या बडा कब्रस्तान भोवती वाढल्या होत्या, प्रकरण चिघळू नये म्हणून पोलीस दलाकडून दक्षता घेतली जात होती. परंतु यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून हा मुद्दा आमचा नसून महानगर पालिका आणि वक्फ बोर्डचा असल्याचे सांगितले जात होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.