चैत्यभूमीवर बसपाने आधीच अडवली अशी जागा

133

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येत्या ६ डिसेंबरला मोठ्याप्रमाणात आंबेडकर अनुयायानी ही राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून विनम्र अभिवादन करण्यासाठी येत असतात. सर्व दलित बांधव या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर एकवटला जात असल्याने आपल्या बांधवांना प्रत्यक्ष नाही पण शुभेच्छाच्या माध्यमातून दर्शन घडवण्याचा प्रयत्न प्रत्येक दलित संघटना आणि संस्थांचे नेते आणि पदाधिकारी करत असतात. त्यामुळेच दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजीपार्क) परिसरांमध्ये सध्या दलित संघटना आणि पक्षांची बॅनरबाजी जोरात सुरु असून यामध्ये मायावती यांचा बहुजन समाज पार्टी (बसपा) आघाडीवर आहे. या पक्षाने शिवाजीपार्क परिसरात अशाप्रकारे बॅनरबाजी केली आहे की अन्य संस्था आणि संघटनांना बॅनर लावायलाही जागा ठेवली नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यंदा चैत्यभूमीवर मोठ्याप्रमाणात आंबेडकर अनुयायी सहभागी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षे कोविडमुळे ऑनलाईन दर्शन प्रणाली राबवून चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांना घरी राहण्याचे आवाहन केले होते. परंतु यंदा कोविडचे सावट दूर झाल्यानंतर प्रथमच महापरिनिर्वाण दिन होत असल्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांसह देशातील इतर राज्यांमधूनही दलित बांधव तथा आंबेडकर अनुयायी मोठ्याप्रमाणात चैत्यभूमीवर येवू शक्यता लक्षात दलित बांधवांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना तसेच पक्षाच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करणारे फलक लावत त्याद्वारे आपले दर्शन बांधवांना घडवण्याचा प्रयत्न केला आहे.

विशेष म्हणजे एरव्ही रिपब्लिकन ऑफ इंडिया (आठवले गट) , भारतीय रिपब्लिकन पक्ष (प्रकाश आंबेडकर), भंडारे गट, गवई गट अशा पक्षांच्या बॅनर सर्वप्रथम लागले जायचे. परंतु यावर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या पाच दिवस आधीच सध्या देशात आणि मुंबईतही सध्या अस्तित्व दिसत नसलेल्या बहुजन समाज पक्षाने दादर स्थानकापासून ते चैत्यभूमीच्या परिसरापर्यंत बॅनरबाजी करत आपल्या पक्षाची आणि नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या परिसरात बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड संदीप ताजने यांनी विनम्र अभिवाद करणारे फलक वीर सावरकर मार्ग, केळुसकर मार्ग, एम.बी. राऊत मार्ग, शिवाजी पार्क मैदानाचा संपूर्ण परिसर, स्वामी समर्थ व्यायाम मंदिर पथ, रानडे मार्ग आदी परिसरांमध्ये लावले आहे. त्या खालोखाल स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष- युथ रिपब्लिकन पक्षाच्यावतीने मनोज संसारे आणि प्रियांका मनोज संसारे, मुंबै बँकेचे सिध्दार्थ कांबळे, दलित युथ पँथर, भाजपच्यावतीने राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांचे काही प्रमाणात बॅनर लागले आहेत.

बसपा पक्षाचे मुंबईत काही अस्तित्व जाणवत नसले तरी आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीकोनातून या पक्षाने आपण या निवडणूक रिंगणात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे या पक्षाच्या या बॅनरबाजीमुळे आगामी निवडणुकीत दलित बांधवांची मते कॅश करण्यासाठी या पक्षाने महापरिनिर्वाण दिनाचा मुहूर्तच साधला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इतर दलित समाजाचे नेतृत्व करणाऱ्या पक्ष व संघटनांच्या तुलतेत चैत्यभूमी परिसरात बसपाच्या बॅनरचा धसका काही प्रमाणात इतर संघटना आणि पक्षांना घ्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.