सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष बांधणीनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा. राज ठाकरेंनी मराठवाडा, पुणे दौरा केला. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या इंजिनमधून बाहेर जाणाऱ्यांची यादी मोठीच आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक मेसेज चांगलाच व्हायरल होत असून हा मेसेज नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर मनसे पक्ष सोडणार असा हा मेसेज आणि तशा बातम्या व्हायरल झाल्या. त्यामुळे बाळा नांदगावकर पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकरांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर…
बाळा नांदगावकर त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, मागील काही दिवसांपासून काही स्वयंघोषित सूत्रांनी माझा पक्ष त्याग व परस्पर पक्ष प्रवेशाची बातमी सुद्धा चालवली. सोशल मीडियाच्या युगात अशा बातम्या किती जोरदार पसरतात हे आपणांस माहीतच आहे. मागील अनेक वर्षांत राजकारणात पक्ष निष्ठा, व्यक्ती निष्ठा हे विषय गौण होऊन फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वरचेवर पक्ष बदलणारे जरी असले तरी सगळेच असे नसतात. खरे तर अशा बातम्या, अफवा या मुद्दामच पेरल्या जातात पण यात अशा बातम्या पेरणारे त्यांचेच हसू करून घेतात. माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित आहे व राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – टीईटी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप, तुकाराम सुपेंना अटक)
“तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम”
तसेच त्यामुळे त्याबद्दल मला काहीच सांगायची गरज नाही. कारण जे मला ओळखतात त्यांना काहीच सांगायची आवश्यकता नाही व जे ओळखून पण खोडसाळपणा करतात त्यांना सांगून काही फायदा नाही. एक जुने हिंदी गाणे माझ्या राजकारणाबद्दल व राजसाहेबांच्या आणि माझ्या संबंधाबद्दल सर्व एका कडव्यात सांगून जाते.”तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम” अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकरांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Join Our WhatsApp Community