पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) गुरुवारी, १९ जानेवारीला मुंबई दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक विकासकामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासाठी भाजप (BJP) आणि शिंदे गटानं (Shinde Group) जय्यत तयारी केली असून मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मोदींच्या या दौऱ्याआधीच गिरगावातील पोस्टर्सबाजीने लक्ष वेधून घेतले आहे. हे पोस्टर्स हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि पंतप्रधान मोदींचे आहेत. पण हे पोस्टर्स कोणी लावले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शिवसेच्या (ठाकरे गट) बालेकिल्ल्यात गिरगावमधील या पोस्टर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हात हातात घेऊन वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. पण या पोस्टर्सवर कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि मोदींचे पोस्टर्स कोणी लावले? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २-अ आणि ७चे लोकार्पण, मुंबई महापालिकेच्या २० नवीन ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे लोकार्पण, ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महानगरपालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन, सुमारे ४०० किमी रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन आणि पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्ज वितरण आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत.
(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास ‘मराठी’त ट्विट, काय म्हणाले मोदी?)