अखेर नारायण राणेंची ‘ती’ इच्छा पूर्ण झाली!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्र्रीय स्मारकात येऊन वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे राणे यांनी दर्शन घेतले.

126

आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. तेव्हा मी भारावून गेलो. त्यावेळी मी साहेबांना म्हणालो, ‘साहेब, तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होते. आयुष्यात जे काही मिळाले आहे, ते साहेबांमुळेच मिळाले आहे.’ आज जर बाळासाहेब असते तर ‘नारायण, तू अशीच प्रगती कर’ असे सांगत त्यांनी डोक्यावर हात ठेवला असता. जरी बाळासाहेबांचा हात प्रत्यक्ष आपल्या डोक्यावर नसला, तरी त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम असणार आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नोव्हेंबर २०१२ पासून ९ वर्षे नारायण राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊ शकले नाही. तब्बल ९ वर्षांनंतर राणे यांची स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली.

राज्यात रोजगार वाढवणार! 

केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याला संधी दिली, त्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मंत्री झाल्यानंतर दीड महिन्यांनी आपण मुंबई, महाराष्ट्रात आलो आहे, मात्र त्याच वेळी भाजपने आपली जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली आहे. त्याबद्दल आपण भाजपचे आभार मानतो. आताच आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. जनतेचा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. आपल्याकडे जे खाते आहे, त्यामाध्यमातून आपण रोजगार निर्मिती करून दरडोई उत्पन्नात वाढ करणार आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

(हेही वाचा : नारायण राणे – शिवसेना आमनेसामने! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरून राजकारण पेटले!)

शिवसेनेचा घेतला समाचार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार, सध्या नव्याने मंत्रिमंडळात समावेश केलेल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांची त्यांच्या त्यांच्या राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या यात्रेची सुरुवात त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर नारायण राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्र्रीय स्मारकात येऊन वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते पुढे निघाले. कुणाही व्यक्ती किंवा देवतेचे स्मारक हे सर्वांसाठी असते. त्यांच्या दर्शनासाठी कुणी विरोध करू नये, मांजराप्रमाणे आडवे येऊ नये. भावनांचा विचार करावा. कुणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी थेट बोलावे, डाव्या-उजव्याकडून बोलू नये. मी देखील जशास तसे उत्तर देऊ शकतो, अशी आपली ख्याती आहे, अशा प्रकारे नारायण राणे यांनी त्यांच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यास शिवसेनेने विरोध केला होता, त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी सडेतोड शब्दांत समाचार घेतला.

मुंबई महापालिकेतील ३२ वर्षांची सत्ता जाणार!  

मुंबई महापालिका निवडणूक ही जबाबदारी माझीच आहे. यासाठी भाजपने मला काय जबाबदारी दिली आहे हे अजून स्पष्ट नाही. मुंबई महापालिकेची मागील ३२ वर्षांची सत्ता आता जाणार आहे, हे लक्षात घ्या. जन आशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यावर मुंबई महापालिकेत काय होणार आहे, याचा प्रत्यय शिवसेनेला आला असेल, असेही नारायण राणे म्हणाले.

(हेही वाचा : नारायण राणे प्रथमच करणार बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.