शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सून स्मिता ठाकरे यांनी शिवसेनेतून ४० आमदार फोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली, तेव्हा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. आता त्याच स्मिता ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्या, यावेळी निमित्त होते वर्षा बंगल्यावर विराजमान गणपतीचे दर्शन घेणे.
शासकीय बंगल्यावर गणपती विराजमान
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यावर गणपती विराजमान आहे. त्याच्या दर्शनासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आणि जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे या बुधवार, ७ सप्टेंबर रोजी दाखल झाल्या आणि पुन्हा एकदा राजकीय पातळीवर चर्चा सुरु झाली आहे. त्यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होत्या.
याआधीही स्मिता ठाकरे यांनी घेतली भेट
याआधी जेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा २६ जुलै रोजी स्मिता ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची भेट घेणाऱ्या स्मिता या ठाकरे कुटुंबातील पहिल्याच व्यक्ती होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात दीर-भावजय असे नाते असले, तरी दोन्ही कुटुंबात सख्य नाही. त्या सामाजिक कार्य आणि चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. मात्र, त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
Join Our WhatsApp Community