राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण कोणाला द्यायचे याबाबत निवडणूक आयोगाला निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मंगळवारी झालेल्या युक्तिवादात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. दरम्यान शिंदे गटाची बाजू लढवणा-या वकिलांच्या फौजेत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू देखील असल्याचे समोर आले आहे.
निहार ठाकरे यांची प्रतिक्रिया
बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे सुपूत्र निहार ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात वकील असून शिंदे गटाच्या वकिलांच्या पॅनलमध्ये त्यांचा समावेश आहे. मंगळवारी आलेल्या निकालानंतर निहार ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहात हे मी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तेव्हाच त्यांना सांगितले होते.
(हेही वाचाः उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा धक्का, पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच)
शिंदे गटाच्या बाजूने आम्ही बाजू मांडली. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला परवानगी दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग सर्व गोष्टींची योग्य ती पडताळणी करुन निर्णय देईल. पण ठाकरे गटाला पुरावे सादर करण्यासाठी अजून मुदत मिळेल असे वाटत नाही, असे निहार ठाकरे यांनी सांगितले.
त्यांनाच पक्षाचा दर्जा
ज्या गटाकडे सर्वात जास्त संख्याबळ असते त्याच गटाला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षाचा दर्जा देण्यात येतो. आम्ही निवडणूक आयोगाला दीड लाख अॅफिडेव्हिट पाठवली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची पुढील तारीख जाहीर करावी यासाठी आम्ही पत्र लिहिणार असल्याचेही निहार ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community