शब्द पाळणे हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

79

माझ्यासारखे असंख्य सर्वसामान्य शिवसैनिक विधानसभा, विधानपरिषदेत पोहचले, बाळासाहेबांना पाहत त्यांच्या विचारांनी माझ्यासारखे कार्यकर्ते प्रभावित झाले. त्यांच्यासोबत काम करत इथपर्यंत पोहचलो आणि बाळासाहेबांच्या विचारांचे सरकारही स्थापन केले, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

एकेकाळी राज्यात काही ठराविक घराण्याची सत्ता होती, परंतु बाळासाहेबांनी सत्ता सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली. सेनेचे खासदार, आमदार ज्यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, त्यांना बाळासाहेबांच्या परिस स्पर्शाने मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाले. अन्यथा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकला नसता. बाळासाहेबांचे विचार ऐकत असताना प्रेरणा मिळते, अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद मिळते. बाळासाहेब एकदा शब्द दिला की ते कधी फिरवत नसत, हाच गुण आम्ही त्यांच्याकडून शिकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाण्याने सेनेला पहिली सत्ता दिली 

विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या शेवटी धाडस महत्त्वाचे असते, त्यासाठी तेवढी ताकद लागते, त्याकरता गुरूदेखील तितकाच ताकदीचा लागतो. बाळासाहेब आणि आनंद दिघे या दोघांची आठवण येते, ठाण्याने सेनेला पहिली सत्ता दिली. बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि आनंद दिघे यांनी त्यावर अंमलबजावणी करायची हे समीकरण होते. हिमालयाएवढा नेता त्यावेळी पाकिस्तानही बाळासाहेबांना घाबरत होता. तरीही त्यांचे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असायचे. वर्तमानपत्रात बातमी वाचून सकाळी त्यांचा फोन यायचा आणि नागरिकांच्या समस्या सांगायचे. ज्यांनी सत्ता दिली त्यांच्या काही अपेक्षा आहेत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे, असे ते सांगायचे, म्हणून २५-३० वर्षे ठाण्याची सत्ता बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही याचा अनुभव आपण घेत आहोत. त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जात आहोत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा सव्वा तीन वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदुहृदयसम्राट लागले याचा अभिमान वाटतो – राज ठाकरेंचा उद्धवना चिमटा)

रिमोट कंट्रोल कधी स्वतःसाठी वापरला नाही 

बाळासाहेब प्रखर हिंदुत्ववादी होते, त्यांनी कधी मतांवर डोळा ठेवून राजकारण केले नाही, सत्तेसाठी तडजोड केली नाही, मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली नाही, विचारांशी कधी तडजोड केली नाही, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही काम करत आहोत. ते रिमोट कंट्रोल होते पण तो स्वतःला काही पाहिजे म्हणून कधी वापरला नाही, बाळासाहेब त्यांना जे करायचे तेच करायचे, ते परखडपणे बोलायचे, अशाही आठवणी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जागवल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.