काँग्रेस पक्ष म्हणजे उत्तर प्रदेशातील रया गेलेल्या जुनाट, पडक्या हवेलीचा जमीनदार, ज्याची आधी खूप जमीन होती, आता उरली नाही. हवेलीची डागडुजी करायलाही पैसे उरले नाहीत, अशा आशयाची वक्तव्ये एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर प्रत्युत्तर दिल्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पवारांवर हल्लाबोल केला, त्यामुळे आता थोरातांच्या वक्तव्यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
पवारांच्या विधानाशी मी असहमत आहे, त्यांच्या विधानाने काँग्रेसचे काहीही नुकसान होणार नाही आणि विरोधकांनाही फायदा होणार नाही. पवारांनी आता काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि देशात लोकशाही, संविधान टिकवण्यासाठी एकत्र लढाई करावी. काँग्रेस हा एक विचार आहे, धार्मिक भेदभावाचे विचार वाढल्याने पक्षाला वाईट दिवस आले आहेत, पण आपण सगळे जण एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असेही थोरात म्हणाले.
(हेही वाचा : शिवसेनेचा यू-टर्न! आता किती जागा लढणार?)
भुजबळ म्हणतात आम्ही तीन झेंड्याखाली!
बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही सध्या तीन झेंड्यांच्या खाली आहोत, त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचाही झेंडा आहे, असे सांगत भुजबळ यांनी थोरातांनाच महाविकास आघाडी धर्माची आठवण करून दिली.
Join Our WhatsApp Community