रुसवे-फुगवे विसरून काँग्रेसला लागली महामंडळाची घाई!

कधी कोरोना संकटामुळे तर कधी अंतर्गत वादामुळे महामंडळावरील नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र आता या रखडलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सुरू असताना आता काँग्रेस हे रुसवे फुगवे विसरून थेट महामंडळासाठी पुढे सरसावली आहे. आज महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्याशी महामंडळ आणि समित्यांचे गठन करण्याबाबत चर्चा केली.

काय म्हणाले थोरात?

शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्याशी आम्ही नेहमीच चर्चा करत असतो. तशीच आजही चर्चा केली. अनेक महामंडळांच्या नियुक्त्या बाकी आहेत. राज्य पातळीवर समित्यांचे गठन बाकी आहे. त्यावर त्यांच्याशी चर्चा केली. तसेच राज्यात अनेक प्रश्न असतात. त्यातील दहा-बारा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात. या सर्वांवर या निमित्ताने चर्चा झाली, असे थोरात म्हणाले.

(हेही वाचा : राज्यांकडील लसींच्या वितरणाचे अधिकार केंद्राने घेतले काढून !)

याद्या तयार, पण मुहूर्त कधी मिळणार?

विशेष म्हणजे मागील सहा महिन्यापासून तिन्ही पक्षाच्या याद्या तयार असून, त्यांना मुहूर्त काही मिळत नव्हता. कधी कोरोना संकटामुळे तर कधी अंतर्गत वादामुळे महामंडळावरील नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र आता या रखडलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्याचमुळे बाळासाहेब थोरात यांनी आज पवारांची भेट घेतली. राज्यातील सिंचन महामंडळे विदर्भ, कृष्णा खोरे, म्हाडा, सिडको तसेच विविध देवस्थान मंडळांवरील नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जातात. पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांची अशा महामंडळ, समित्यांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यामुळे आता या महामंडळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here