राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातच शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा केला आहे. याच दरम्यान आता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या यांनी प्रतिक्रिया देताना काॅंग्रेसच्या गोठवलेल्या चिन्हाचे उदाहरण देत शिवसेनेचा विजय कसा होईल, हे सांगितले.
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, पुढच्या आठवड्यात पितृपक्ष सुरु होत आहे. या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली येतील, त्यामुळे धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हीच जिंकू, असे वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
( हेही वाचा: मुंबईत पाच ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी; बोरिवली, सायनसह झोपडपट्टीतही धाडी )
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मनसुबे, त्यांचे दात- नखे ख-या अर्थाने दिसायला लागले आहेत. समोरच्याला चारी मुंड्या चित करायचे, पण लोकशाही पद्धताने नाही, चिन्ह स्वत: कडे घ्यायचे किंवा गोठवायचे हा त्यांचा इरादा आहे. पण आमच्याकडे चिन्हावर लढूनही अनेक जण हरलेत. चिन्ह महत्त्वाचेच आहे. माझा न्यायदेवता आणि संविधानावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्याला उद्धव ठाकरे सामोरे जातील.
निवडणूक आम्हीच जिंकू
धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आमच्याकडेच राहील. गाय वासरु हे काॅंग्रेसचे निवडणूक चिन्ह होते. ते गोठल्यानंतर हात हे निवडणूक चिन्ह मिळाले. त्यानंतर झालेली पहिली निवडणूक काॅंग्रेसने जिंकली होती. त्यामुळे आमचाही विजय नक्कीच होईल. तसेच, जर धनुष्यबाण हे चिन्ह नाहीच मिळाले तर दुसरे जे चिन्ह मिळेल ते घराघरात पोहोचवू असा आमचा विश्वास आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.