बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंगळवारी भेट घेतली. आपला इतिहास, भाषा आणि संस्कृती आपल्याला एकमेकांशी जोडतात, असे हसिना यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध मोठ्या प्रमाणावर वृध्दिंगत झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
(हेही वाचा – राज्याच्या पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार)
दोन्ही देशांनी ज्या प्रकारे बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष आणि भारत-बांगलादेश द्विपक्षीय संबंधांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला, ते अत्यंत खास आहे. या ऐतिहासिक सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते, यावरून भारत बांगलादेशसोबतच्या संबंधांना किती महत्त्व देतो हे दिसून येते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. नागरिकांना सामाजिक-आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यात बांगलादेशने मोठे यश मिळवले आहे, हे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशच्या विकासाच्या वाटचालीत भारत एक विश्वासार्ह भागीदार राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारत आणि बांगलादेशचे संबंध नेहमीच सहकार्याच्या भावनेने आणि परस्पर विश्वासाचे राहिले आहेत. महामारी आणि सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी भारत आणि बांगलादेशने आर्थिकदृष्ट्या अधिक जोडलेले राहावे ही काळाची गरज आहे, या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक परिपक्व आणि विकसित होतील, असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community