मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौ-याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याची तारीख जाहीर करण्यात आली. त्यांच्या या दौ-यासाठी शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. पण अयोध्येतील हे बॅनर आता प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावरुन उत्तर प्रदेशातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
(हेही वाचाः आम्ही फालतू विषयांवर बोलत नाही, राणांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर)
प्रशासनाने हटवले बॅनर
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याची तारीख ठरल्यानंतर शिवसेनेकडून त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. ‘असली आ रहे है, नकली से सावधान’,अशी बॅनरबाजी देखील शिनेकडून अयोध्येत करण्यात आली होती. पण आता हेच बॅनर अयोध्या प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत. अयोध्येतील नया घाट परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते. त्यामुळे आता उत्तर प्रदेशातील शिवसैनिक आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः मला जातीवादी म्हटलं, त्याचा मी आस्वाद घेतला- शरद पवार)
शिवसेनेची बॅनरबाजी
अयोध्येत जे बॅनर झळकले होते, त्यावर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरल्यापासून, शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये हिंदुत्वावरुन चढा-ओढ सुरू झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळेच राज यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका नकली असल्याचे, शिवसेनेने या बॅनरमधून सूचित केले आहे.