बारामती लोकसभेची जागा शिंदे गटाला? सुप्रिया सुळेंविरोधात विजय शिवतारे मैदानात उतरणार

115

पवारांचा बालेकिल्ला अर्थात बारामती लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, सुप्रिया सुळे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी नवनव्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुळे यांच्या विरोधात मुरब्बी राजकारणी मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री विजय शिवतारे यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. शिवतारेंना बारामतीमधून उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपा आणि शिंदे गटात त्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

( हेही वाचा : उच्च शैक्षणिक अर्हता असूनही अपात्र! अर्जासाठी मुदतवाढ देण्याची MPSC च्या उमेदवारांची मागणी)

महाराष्ट्रातील ४८ पैकी किमान ४५ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने ठरवले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला ४८ पैकी ४३ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला ४, तर काँग्रेसला चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी केल्याने यावेळी या जागा राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेने भाजपशी युती केली असून शिवसेनेचे १३ खासदारही त्यांच्यासोबत गेले आहेत. तरीही राज्यात ४५ खासदार निवडून आणणे भाजपासाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे जिंकण्याच्या निकषावर मातब्बर नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा विशेष जोर आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांची फौज बारामतीत तळ ठोकून आहे. दर सहा महिन्यागणिक सर्व्हे केले जात आहेत. यंदा कांचन कुल यांच्याऐवजी अनुभवी नेता मैदानात उतरवावा, असा सूर या सर्वेक्षणांतून उमटू लागला आहे. त्यामुळे भाजपाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. आमदार राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, यांसह आणखी काही नावांची चर्चा झाली. मात्र, सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्याइतपत त्यांची राजकीय ताकद नसल्यामुळे दोन्ही नावे मागे पडली. सध्या विजय शिवतारे यांचे नाव आघाडीवर आहे. शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवतारे यांची पुणे जिल्ह्यावरील पकड पाहता ते सुळे यांना तुल्यबळ लढत देऊ शकतील, असा विश्वास भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला आहे.

स्थानिक समीकरणे अशी…

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यापैकी चार मतदारसंघांत महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे पारडे जड मानले जात असले, तरी विजय शिवतारे यांची ताकदही येथे मोठी आहे. ते स्वतः पुरंदर मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहे. मागच्यावेळी अजित पवार यांच्याशी पंगा घेतल्यामुळे त्यांचा पराभव झाला. मात्र, आता तशी स्थिती राहिलेली नाही. शिवाय दौंड, इंदापूर, पुरंदर आणि खडकवासलामध्ये भाजपाची ताकद गेल्या काही वर्षांत वाढली आहे. भोरचा विचार करता स्थानिक कॉंग्रेस आमदार देवेंद्र फडणवीसांशी सलगी राखून आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार म्हणून शिवतारे तगडे आव्हान निर्माण करू शकतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींना आहे. त्यामुळे त्यांचे तिकिट जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.