स्वातंत्र्यलढा, महाराष्ट्र लढा नंतर गिरणी कामगार संघर्ष या इतिहासाचे साक्षीदार असलेली वरळी बीडीडी चाळ शंभर वर्षांनंतर रुपडे बदलणार आहे. त्यामुळे बीडीडी चाळीविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. बीडीडी ही मराठी संस्कृतीची जीवंत साक्षीदार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी आणि जुनी असलेल्या चाळीची पडझड सुरु झाली होती. तिच्या पुनर्वसनाचा विषय रेंगाळलेला होता. आता हा पुनवर्सनाचा मार्ग मार्गी लागला आहे.
…आणि बीडीडी चाळीचे गृहनिर्माण संस्थेत रूपांतर झाले!
बीडीडी या चाळींचा सुमारे १०० वर्षांचा इतिहास आहे. दुसऱ्या महायुद्धातील कैद्यांना ठेवण्यासाठी बीडीडी चाळी वापरण्यात आल्या होत्या. बॉम्बे डेव्हलपमेंट डायरेक्टरेट चाळ म्हणजे बीडीडी चाळ. त्यावेळी मुंबई दादर, माहीमपर्यंत सीमित होती, मात्र त्यानंतर आता उपनगरीय लोकल सुरु झाली, त्यावेळी वरळी भागात येणे-जाणे वाढले, तसेच त्या भागात स्थलांतरही वाढले. म्हणूनच जागेची अधिक आवश्यकता भासू लागली. या पार्श्वभूमीवर सर जॉर्ज लॉईड यांनी गृहनिर्मिती व विकासाची मोठी योजना तयार केली आणि या योजनेची अंमलबजावणी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीच्या माध्यमातून करण्यात आली.
(हेही वाचा : यंदा लालबागचा राजाचे दर्शन घडणार! मूर्ती किती फूट असणार?)
बीडीडी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची साक्षीदार!
मुंबई राज्याच्या तत्कालीन समाजव्यवस्थेत कामगार वर्गाचे आश्रयस्थान अशी बीडीडी चाळींची त्या काळी ओळख होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही बीबीडी चाळीतून ताकद मिळाली. येथील जांभोरी मैदान संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे साक्षीदार आहे. आजही अनेक ऐतिहासिक गोष्टींची ही चाळ साक्ष देते. याच मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली होती. कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या कामगार चळवळीचे प्रमुख केंद्र या भागात होते. गिरणी कामगार संघर्षाचेही बीडीडी चाळ हे केंद्रस्थानी होते. या चाळींमध्ये अनेक सभा-संमेलने गाजली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बीडीडी आणि बीआयटी चाळीतील अनेक लोकांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक स्वातंत्र्यसैनिक या चाळीतून जन्माला आले. बीडीडी चाळीला सांस्कृतिक इतिहासही असाच गौरवपूर्ण आहे.
दक्षिण आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प
आता याच बीडीडी चाळीचा पुनर्विकास होणार आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला उच्चाधिकार समितीने मान्यता दिली असून, या चाळींच्या विकासाचा प्रश्न सुटला आहे. वरळी, ना.म.जोशी मार्ग, परळ व नायगांव येथील शासनाच्या ३४.०५ हेक्टर जागेवर १९५ चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ+3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. या चाळींचा पुनर्विकास करुन या चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community