‘आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. पण कौतुक केले की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना…थप्पड से डर नहीं लगता…पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ…थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही’, असा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी, ‘…तर शिवसेनाभवन फोडू!’, असे वक्तव्य केले होते. त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड भूमिका घेत आक्रमकता दाखवली.
३६ महिन्यांत चाव्या द्यायला पुन्हा भेटू!
वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. काही क्षण आयुष्यात अनपेक्षित येत असतात. जसे मी मुख्यमंत्री व्हावे, हे माझ्या मनातही नव्हते, तसे मी मुख्यमंत्री असताना बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे, हेदेखील माझ्या स्वप्नात नव्हते. आज भूमिपूजन झाले आहे, ३६ महिन्यांत आपण चाव्या देऊ, असे सांगत स्वतःची हक्काची घरे झाल्यावर मोहाला बळी पडू नका, असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीडीडी चाळीच्या रहिवाशांना दिला.
(हेही वाचा : १९२० पासूनची बीबीडी चाळ होणार नवीन! चाळीचा काय आहे इतिहास?)
घरे विकून मराठी टक्का कमी करू नका! शरद पवार
एका बाजूने राज्यातील पूरग्रस्त भागातील घरांची बांधणी करणे हे आव्हान असताना दुसरीकडे कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याचे मोठे पाऊल पडत आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग आहे. बीडीडी चाळ आणि या परिसरात देशाचा इतिहास घडला, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते. ज्यांनी या देशातील प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला. त्यांचे देखील आज या ठिकाणी स्मरण करतो. परिवर्तनाच्या चळवळीत अत्यंत महत्वाचे मार्गदर्शनाचे काम करणारे, प्रबोधनकार ठाकरे यांचे दखील वास्तव्य या परिसरात एकेकाळी होते, अण्णाभाऊ साठेंचेही होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीत ज्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचाही संचार या भागात होता आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संबंध महाराष्ट्र जागृत करण्यासंबंधी कार्य करणारे आचार्य अत्रे हेदेखील इथे रहायचे. अशा या परिसराचा आता पुनर्विकास होणार आहे, उद्या इथे तोवर होतील, तेव्हा विकून जाऊ नका, मराठी टक्का कमी करू नका, मराठी संस्कृती नष्ट करू नका, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
Join Our WhatsApp Community